महावितरणकडून २९ कंपन्या, चार शीतगृहांकडून ११ कोटी २१ लाखांची वसुली

नवी मुंबई : विजेचा बेकायदा वापर शहरात वाढला असून या विरोधात महावितरणने शोध माहिम सुरू केली आहे. या अंतर्गत २९ कंपन्या, शीतगृहांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ११ कोटी २१ लाखांची वसुली केली आहे. वाशी महावितरणचे अधीक्षक अभियंते राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरांत महावितरणतर्फे ही कारवाई सुरू करण्यात आली.  विद्युत अधिनियम २००३ अन्वये कलम १२६ अंतर्गत एखादा वीज ग्राहक बेकायदा विजेचा वापर करीत असेल तर त्याला सरासरी देयक दिले जाते. त्यावर समोरील ग्राहकाची बाजू ऐकून अंतिम देयक देण्यात येते. संबंधित ग्राहकाला ते देयक मान्य नसल्यास अपिलीय अधिकाऱ्यांकडे त्याला दाद मागता येते. ग्राहकाने आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास देयकाची रक्कम शून्य येऊ  शकते. त्यानुसार वाशी मंडळाने जानेवारी २०२० पासून मार्च २०२१ या कालावधीत एकूण ७९ उच्चदाबाच्या ग्राहकांच्या वीज संचाची तपासणी केली. त्यात २९ वीज ग्राहक विजेचा बेकायदा वापर करीत असल्याचे उघडकीस आले. या ग्राहकांकडून वाशी मंडळाने ११ कोटी २१ लाख रुपयांचा महसूल गोळा केला.

वाशी मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शीतगृहांचा समावेश आहे. त्यांच्या वीज संचाची तपासणी केली असता चार शीतगृहांनी बेकायदा वीज वापर केल्याचे उघडकीस आले असून पी. एम. व्हीनस, मीरा मॅक्स, सुरेश फूट वेअर आणि सावला या शीतगृहांना शेती ते औद्योगिक दराच्या फरकाच्या रकमेची आकारणी करून ३ कोटी ८२ लाख रुपयांची आकारणी करण्यात आली. संबंधित वीज ग्राहक शेती व्यवसाय दाखवून वीज वापर करीत होते. त्यामुळे त्यांना शेतीला लागणारे कमी दर वीज वापरता येत होती. परंतु त्यांचा बेकायदा वापर उघडकीस आल्यामुळे त्यांना यापुढे औद्योगिक विजेचे दर आकारण्यात येणार आहेत.

यांच्याकडून बेकायदा वापर

  • पी.डी.लाईट तळोजा : २७ लाख ७५ हजार
  • जी.टी. एल महापे : २ कोटी २६ लाख
  • लोमा आयटी पार्क : २ कोटी १ लाख
  • पावरिका तळोजा : ३६ लाख ४९ हजार
  • रिव्हीव रियालिटी तुर्भे :  २ कोटी २ लाख
  • एमटीएनएल पनवेल : २२ लाख
  • सिडको ऑडिटोरियम : ३० लाख ४९ हजार
  • एमटीएनएल सीबीडी : ३१ लाख १२ हजार
  • ई. एफ. सी रबाळे : २१ लाख
  • व्हेनस शीतगृह : १८ लाख २७ हजार
  • मॅनटेक इंडस्ट्रीज तुर्भे : १२ लाख ३१ हजार

महावितरण वाशी मंडळाकडून विजेचा बेकायदा करून फसवणूक करणाऱ्यांवर महावितरणकडून कडक कारवाई करून दंड वसूल करण्यात आलेला आहे. यापुढेही अशी कारवाई करण्यात येणार आहे.

– राजाराम माने, अधीक्षक अभियंता, महावितरण वाशी मंडळ