आज बोकडवीरा ग्रामस्थांचे आंदोलन

उरण तालुक्यातील बोकडवीरा ग्रामस्थांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सिडको व रेल्वेच्या विरोधात मंगळवारपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला असून प्रथम पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करा आणि नंतरच विकास कामे करून देऊ अशी भूमिका घेतली आहे.

प्रथम पुनर्वसन, नंतर विकासकामे या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम

उरण : उरण तालुक्यातील बोकडवीरा ग्रामस्थांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सिडको व रेल्वेच्या विरोधात मंगळवारपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला असून प्रथम पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करा आणि नंतरच विकास कामे करून देऊ अशी भूमिका घेतली आहे. यासाठी काम बंद व बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. बोकडवीरा गाव हे सिडकोच्या नवी मुंबईच्या विकासाचाच एक भाग आहे. गावाच्या महसूल हद्दीत मोठय़ा प्रमाणात सिडकोची व रेल्वेची विकासाची कामे सुरू आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांच्या समस्या प्रलंबित आहेत. यासंदर्भात सिडकोसोबत वारंवार चर्चा होऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. यामध्ये प्रामुख्याने उरण ते बेलापूर रेल्वे मार्गात येणाऱ्या बोकडवीरा रेल्वे स्थानकाच्या आराखडय़ात येणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची राहती घरे कायम ठेवावीत, अशीही मागणी केली जात आहे.

यासाठी सुधारित आराखडा तयार करण्याची मागणी, त्याचप्रमाणे गावातील गरजेपोटी बांधण्यात आलेली घरे विनाअट नियमित करणे, साडेबारा तसेच वाढीव दराची प्रकरणे त्वरित मान्य करीत ग्रामस्थांना त्याचा लाभ देणे, बोकडवीरा गावाच्या स्थानकाला देण्यात आलेल्या द्रोणागिरी नावाऐवजी बोकडवीरा नाव देण्यात यावे तसेच सिडकोकडून विकसित केले जात असलेले द्रोणागिरी नोड हा बोकडवीरा महसूल हद्दीत असल्याने त्याचेही नामकरण बोकडवीरा नोड असे करण्यात यावे अशा मागण्या आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सिडकोने इतर विभागांना त्या त्या महसुली गावांची नावे दिली आहेत. यासाठी ग्रामपंचायत बोकडवीरा, ग्रामस्थ मंडळ, ज्येष्ठ नागरिक व देवस्थान ट्रस्ट या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rehabilitation agitation villagers development work ysh

Next Story
शहरातील शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी