नवी मुंबई : एपीएमसीतील एका कुरिअर कंपनीतून चोरीची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून गुजरात येथून चार जणांना अटक करून त्यांच्याकडून चोरीची १ कोटी ४० लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी चोरी करण्यासाठी या कंपनीत काही दिवस नोकरी करून रेकी केली व बनावट चावीच्या सहाय्याने शटर उचकटून ही चारी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
चोरीनंतर काम करणारे कर्मचारी बेपत्ता असल्याने त्यांच्यावर संशय होता. मात्र त्यांचा कुठलाही ठावठिकाणा नसल्याने व त्यांनी मोबाइल बंद ठेवल्याने पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नव्हते. आरोपीने काही क्षणापुरता मोबाइलचा वापर केला आणि ते पोलिसांच्या जाळय़ात सापडले.
शंभू आहिर, भूपेंद्रसिह जाडेजा, किरीटसिंग वाघेला, राजेंद्र वाघेला असे अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी अत्यंत योजनाबद्ध ही चोरी केली. यात प्रमुख सूत्रधार हा राजेंद्र होता. एपीएमसी पोलीस ठाण्याअंतर्गत एका कुरिअर कंपनीत ३१ मार्च रोजी आरोपींनी बनावट किल्लीने शटर उचकटून आत प्रवेश करीत १ कोटी ४० लाखांची रोकड चोरी केली. त्यांनी आपले मोबाइल बंद ठेवले होते. त्यामुळे तांत्रिक तपास थांबला होता.आरोपी गुजरातमधील पाटण व कच्छ या ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथके या ठिकाणी पाठवण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आले, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली.
ज्या ठिकाणी चोरी झाली त्यांच्याकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रोकड कशी व कुठून आली. कंपनी नेमके काय काम करते, याबाबत तपास सुरू आहे. याचा हिशोब न मिळाल्यास याबाबत आयकर विभागाला कळवण्यात येईल. – सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त
नोकरी करीत विश्वास संपादन
आरोपींना कुरिअर कंपनीत मोठया प्रमाणात रोकड येत असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी नोकरी करण्याचे ठरवले. काही दिवस नोकरी करीत वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. बनावट किल्ली बनवून घेतल्या. रेकी करीत चोरीचे नियोजन केले. २३ मार्च रोजी त्यांनी चोरीचा पहिला प्रयत्न केला. मात्र १० लाखांचीच रोकड हाती लागली. त्यामुळे नियोजन रद्द केले.