रिलायन्स फोर जीच्या भूमिगत वाहिन्यांच्या खोदकामांमुळे सामान्य पनवेलकर हैराण झाला आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी अन्य भूमिगत वाहिन्यांची माहिती न घेता रस्ते खोदल्याने पनवेल शहरामधील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गलथानपणामुळे वीजवाहिन्या, जलवाहिन्या आणि एमटीएनएलच्या वाहिन्या ठिकठिकाणी तुटल्या आहेत.
पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी पावसाळ्यात फोर जीचे खोदकाम करू नका, असे फर्मान सोडले होते. आता हे काम जोमात सुरू झाले आहे. महात्मा फुले मार्ग व यशोमंगल सोसायटीसमोर सुरू केलेले हे काम संध्या थंडावले आहे. असाच एक खड्डा रेडियन्स दुकानासमोर आहे. याच खोदकामामुळे रस्त्याखालील वीजवाहिनी तुटून लाइन आळीतील वीजपुरवठा तब्बल चौदा तास खंडित झाला.
असाच फटका गार्डन हॉटेल ते अमरधाम स्मशानभूमी या मार्गावरील जलवाहिन्यांना बसला. येथे जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दीड दिवस लागले. पटवर्धन मार्ग ते जुन्या पोस्टाजवळील जलवाहिनी फुटल्याने रविवारी तेथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. साईनगर येथील मानसरोवर इमारतीजवळील एमटीएनएलची वाहिनी तुटल्याने अनेक दूरध्वनी बंद पडले. खोदकामांच्या ठिकाणी नगर परिषदेच्या नगर रचना विभागाचे अधिकारी, वीज, पाणीपुरवठा व एमटीएनएल विभागाचे अधिकारी असावेत, अशी मागणी नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी केली आहे.