उरण : पावसामुळे उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा ते नवघर पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा उरण तालुक्यातील नागरिक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत सध्या बोकडवीरा, वायू विद्युत केंद्र कामगार वसाहत आदी ठिकाणच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सिडकोकडून सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा – स्थानक सफाईवरून रेल्वे-सिडको यांच्यात टोलवाटोलवी, सफाई कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत
हेही वाचा – नवी मुंबई : चौदा गावांना लवकरच सुविधा; आपला दवाखाना, आरोग्य केंद्रे उभारण्याच्या सूचना
हे खड्डे भरण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. अशाच प्रकारचे काम वीर वाजेकर महाविद्यालय तसेच नवघर उड्डाणपूल तेथेही करण्यात आले आहे. बोकडवीरा पोलीस चौकी ते नवघर फाटादरम्यानचा मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिडकोकडे वर्ग करण्यात आला आहे. या मार्गाच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी ही सिडकोची आहे. या मार्गाला सेक्टर ४१, बोकडवीरा स्मशानभूमी मार्ग, विद्युत कामगार वसाहत, सिडको कार्यालय आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. याचा फटका या मार्गाने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार तसेच रिक्षाचालकांना बसत आहे. याच मार्गाने सध्या एसटी बसेस, विद्यार्थी वाहने ये-जा करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.