नवी मुंबई : सिडकोने वसविलेल्या नियोजित नवी मुंबईतही धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर होत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी इमारतींचा सव्‍‌र्हे करून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची घोषणा केली जाते, मात्र यातील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत मात्र काहीच होत नाही. गेल्या वर्षीपर्यंत ३७८ इमारती धोकादायक, तर ५८ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. आता नव्याने सर्वेक्षण होऊन यात भर पडणार आहे.

महापालिकेकडून धोकादयक इमारती घोषित केल्या जातात. २०१७ मध्ये ३०३ इमारती धोकादायक होत्या. त्यात ५३ इमारती अतिधोकादायक होत्या. तर २०१८ मध्ये धोकादायक इमारतींच्या यादीत ७५ची भर पडली होती. ३७८ इमारती धोकादायक तर ५८ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या होत्या, परंतु धोकादायक इमारती जाहीर केल्यानंतरही बहुतांश नागरिक याच धोकादायक इमारतीमध्ये वर्षांनुवर्षे राहात आहेत.

मुंबई शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली. सिडकोने नियोजनबद्ध विकसित केलेल्या शहरात सिडकोकालीन इमारतींचा प्रश्न  दिवसेंदिवस गंभीर झाला आहे. बहुतांश इमारती या धोकादायक यादीत दिसतात. यासह आता खासगी इमारतींची संख्याही धोकादायक यादीत वाढत आहे.  एकीकडे शहरात २.५ एफएसआयचा निर्णय झाला असला तरी तांत्रिक अडचणीमुळे हे स्वप्न अजून सत्यात उतरलेले नाही. त्यामुळे नुसत्या इमारती धोकादायक यादीत समावेश होत असून येथील नागरिकांना मात्र त्याच इमारतीत राहावे लागत आहे.

काहीच नियोजन नसल्याने नागरिकांनी जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पालिका अशा रहिवाशांची समाज मंदिर,बहुउद्देशीय इमारती, शाळा या ठिकाणी राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे सिडकोच्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी सुरुवातीपासूनच या इमारतींच्या देखभालीकडे लक्ष न दिल्यामुळे या इमारती अप्लावधीतच धोकादायक बनल्या आहेत. त्यात वाढीव अडीच एफएसआय मिळवण्यासाठी धोकादायक इमारतींच्या यादीबाबतच शंका निर्माण केली जात आहे. पालिकेने बेघरांच्या निवासासाठी बांधलेली निवारा केंद्रेही बोटावर मोजण्या इतकी आहेत.

पालिका धोकादायक इमारती जाहीर करते. विभाग अधिकारी स्तरावर पाहणी करून पालिकेच्या धोकादायक इमारती समितीद्वारे निश्चित केल्या जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धोकादायक इमारतींची यादी निश्चित करून ती जाहीर करण्यात येईल.

-रवींद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका