नवी मुंबई : नेरुळ येथे असलेल्या दोन अनधिकृत इमारतींवर सुरु झालेली कारवाई स्थानिक माजी नगरसेवकामुळे झाली असा आरोप करीत माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर जाऊन संबंधित इमारतीतील रहिवाशांनी त्यांचा सत्कार केला. घटना ऐकण्यास विचित्र वाटत असली तरी सत्य आहे. मात्र सदर भूखंडावर उद्यान उभे करण्याची मी मागणी केली होती, ही मागणी जेव्हा केली त्यावेळी तर इमारती उभ्याही राहिल्या नव्हत्या, असे स्पष्टीकरण माजी नगरसेवकाने दिले आहे. हा प्रकार विरोधकांच्या चिथावणीने सुरु असून त्यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबियांना धोका असल्याचा आरोप माजी नगरसेवकाने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 नेरुळ येथील सेक्टर १६ मधील उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर कृष्णा आणि त्रिमूर्ती या इमारती अनधिकृत पणे बांधण्यात आल्या होत्या. सदर इमारतींवर अतिक्रमण विभागाने न्यायालयाच्या आदेशाने कारवाई सुरु केली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून या इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतरही इमारतींमध्ये रहिवासी वापर सुरूच होता. त्यामुळे गेल्या चार दिवसांपूर्वी महापालिकचे उपायुक्त राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने या इमारतीवर कारवाई सुरु केली.  दोन्ही इमारती मिळून शेकडो कुटुंबं या ठिकाणी राहत असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी मनपाने पोलिसांचीही मदत घेतली. सध्या बहुतांश रहिवाशांनी इमारत सोडली आहे. मात्र सदर इमारती बाबत माजी नगरसेवक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख सतीश रामाणे  यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली असल्याचा दावा रहिवाशांनी केला. प्रकरण एवढ्यावर थांबले नाही तर रविवारी मोठ्या प्रमाणात रहिवासी जमले व त्यांनी थेट  सतीश रामाणे यांचे कार्यालय गाठून त्यांचा सत्कार केला.  त्यावेळी अतिक्रमण कारवाई माझ्यामुळे करण्यात आली नाही हे सांगण्याचा प्रयत्न  सतीश रामाणे करत राहिले. 

आणखी वाचा-नवी मुंबईतील २०१५ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

याबाबत सदर इमारतीतील रहिवासी किरण धांदरुट यांनी सांगितले की, आम्ही अतिक्रमण विरोध करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला यात काही चुकले नाही. संबंधित नगरसेवकांनी आपल्या प्रभागात अनधिकृत इमारत उभी राहत असताना त्याला विरोध केला असता तर शेकडो लोकांची आर्थिक फसवणूक झाली नसती. बाकी प्रभागात अनधिकृत बांधकाम होत असताना काय काय व्यवहार होत असतात ते उघड सत्य आहे, असेही किरण यांनी सांगितले.  

मी कोणत्याही बांधकामाची तक्रार केलेली नाही. मी नगरसेवक असताना ३१ ऑगस्ट २०१० रोजी उद्यानासाठी  राखीव असलेल्या भूखंडाचा विकास करावा म्हणून प्रस्ताव टाकला होता. त्यावेळी या भूखंडावर अनधिकृत इमारती उभा नव्हत्या. त्यानंतर उभ्या राहिल्या. या इमारतीत घरे घेणाऱ्या  रहिवाशांची फसवणूक विकासकाने  केली आहे. त्यांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढावा. विनाकारण मला लक्ष्य करू नये, तसेच  माझ्या  आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका असून याप्रकरणी आपण नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे, असेही रामाणे यांनी स्पष्ट केले आहे. अनधिकृत इमारती माझ्यामुळे सील झाल्या आहेत असा अपप्रचार काही भूमाफियांनी चालवला आहे. पालिकेचे काही अधिकारीही त्याला खतपाणी घालत आहेत. -सतीश रामाणे (माजी नगरसेवक आणि उपशहर प्रमुख  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents visited former corporators office and felicitated for action taken against unauthorized buildings mrj
First published on: 05-02-2024 at 13:12 IST