नवी मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांर्तगत नवी मुंबई पालिकेने ‘हवे असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या’ अशी संकल्पना राबविण्यात आली असून शहरातील मोक्याच्या ६८ ठिकाणी १६ खणांची कपाटे ठेवण्यात आली आहेत. या कपाटातील खणांत वापरातील कपडे, चप्पल, बूट, भांडी, खेळणी, अंथरुण पांघरुण आणि पुस्तके ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या जीवनावश्यक वस्तूंवर नजर ठेवण्यासाठी त्या परिसरातील स्वच्छता पर्यवेक्षक, स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पालिकेच्या या माणसुकी जपणाऱ्या उपक्रमामुळे कपाटाच्या खणाखणांद्वारे माणुसकीचे दर्शन घडत आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात असून ही माणुसकीची कपाटे वस्तूंनी ओसंडून जात असल्याचे चित्र आहे.
परदेशातील काही विकसित देशात फ्रीज मोकळय़ा जागेत अन्नपदार्थानी भरून ठेवले जातात. या अन्नाची गरज असलेले नागरिक या फ्रीजमधून अन्न घेऊन आपल्या पोटाची खळगी भरत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुंबईत काही दिवसांपूर्वी माणुसकीची भिंत उभारून वापरलेले कपडे जमा केले जात होते. करोना काळात अशा प्रकारचे अनेक मदतीचे हात पुढे आले होते. याच पद्धतीने नवी मुंबई पालिकेने कपडे, चप्पल, बूट, खेळणी, अंथरुण-पांघरुण
पुस्तके आणि इतर वापरातील नाशिवंत नसलेल्या जीवनावश्यक वस्तू ठेवण्यासाठी पंधरा ते वीस खणांचे एक लोखंडी कपाट ठेवण्यात आले आहे. यातील प्रत्येक खणावर वस्तूचे नाव लिहिलेला फलक लावला आहे. बेलापूर येथील कॉम्रेड भाई पाटील चौकाजवळ तसेच आर्टिस्ट व्हिलेजमध्ये अशा प्रकारचे माणुसकीच्या खणांचे कपाट ठेवले असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कपाटांची मागणी वाढत असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब रांजळे यांनी सांगितले. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून उभ्या राहणाऱ्या या माणुसकीच्या कपाटांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. तुम्हाला हवे असलेले घेऊन जा आणि नको असलेले घेऊन या आणि ते या माणुसकीच्या कपाटात ठेवून जा असा संदेश दिला जात आहे.
या खणात मोठय़ा प्रमाणात अत्यावश्यक वस्तू ठेवल्या जात असून जनतेने या उपक्रमात मोठय़ा प्रमाणात सहभागी होऊन या महागाईच्या काळात गरीब गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.