पनवेल : मावळ लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालाने पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. चार महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने पनवेल विधानसभेतील निवडणूकीत भाजपची मते कमी झाली का असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
 
पनवेल विधानसभेच्या येऊ घातलेल्या चार महिन्यांवरील निवडणूकांना आ. प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा सामोरे जाणार आहेत. मात्र २०१९ सालच्या विधानसभा निवडणूकीत आ. ठाकूर यांना पावणेदोन लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. मावळ लोकसभेच्या मंगळवारच्या निकालपत्रात महायुतीचे श्रीरंग बारणे यांना १,५०,९२४ मते मिळाली. ही मते पडण्यासाठी आ. प्रशांत ठाकूर यांनीही विधानसभा निवडणूकीच्या रंगीत तालिमीप्रमाणे रस्त्यावर उतरुन प्रचार केला. विधासभा क्षेत्रातील बुथनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य प्रचार सभा खारघर येथे घेण्यात आली. त्यानंतरही महायुतीच्या उमेदवार बारणे यांना मिळालेली मते कमी असल्याने ही मते कमी होण्याची कारणे काय असा प्रश्न भाजपच्या चाणक्यांना पडला आहे. महायुतीच्या उमेदवार बारणे यांना यावेळी कमी मते मिळाली त्याही पेक्षा या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना १,१९,८८६ मते मिळाली. ही बाब भाजपच्या चाणक्यांना चिंतेत टाकणारी आहे.

हेही वाचा…पनवेल महापालिकेचे समाजमाध्यमाद्वारे नियुक्तीचे खोटे पत्र, पालिका प्रशासन फौजदारी प्रक्रिया करणार

२०१९ सालच्या विधानसभेच्या निवडणूकीत शेकापचे उमेदवार हरेश केणी यांना ८६ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे शेकाप, शिवसेना, काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने पनवेल विधानसभा क्षेत्रात चार महिन्यांपूर्वी बाळाराम पाटील यांच्यासारखा दारोदारी प्रचार करणारा भक्कम उमेदवार दिल्यास आ. ठाकूर यांची चौथ्यांदा विजयाची वाट खडतर होण्याची शक्यता मानली जाते. त्याशिवाय २०१९ सालच्या निवडणूकीत १२ हजारांहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. मंगळवारच्या लोकसभेच्या मतमोजणीत पनवेलच्या ४४०१ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची चिंता वाढली आहे. २०१९ साली विधानसभेच्या निवडणूकीत ५४.१३ टक्के तर लोकसभेच्या यावेळच्या निवडणूकीत ५४.८७ टक्के मतदान झाल्याने मंगळवारी लोकसभेच्या निकालानंतर भाजपचे पनवेलमधील अनेक चाणक्य जल्लोष साजरा करण्यापेक्षा कोणत्या बुथवर किती मतदान झाले याची आकडेवारी जुळविण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.