राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने नुकतीच ऑनलाइन रिक्षा परवाना लॉटरी काढली आहे. या लॉटरीमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय करीत परप्रांतीयांना मोठय़ा प्रमाणावर परवाने दिल्याबद्दल शिवसेनाप्रणीत धर्मवारी रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने बुधवारी वाशी येथील आरटीओच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
परप्रांतीय रिक्षाचालकांनी बोगस पुरावे सादर करून परवाने काढल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करीत सदर प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेच्या वतीने सहा. उपप्रादेशिक परिवहन आधिकारी आ. व्ही. मोडक यांना या वेळी निवेदन सादर करण्यात आले. नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणावर मराठी रिक्षाचालक आहेत. मात्र या रिक्षाचालकांना ऑनलाइन परवाने देण्यासाठी विशेष मोहीम राज्य सरकारने सुरू केली होती. या ऑनलाइन रिक्षा परवान्यांत जाहीर करण्यात आलेल्या लॉटरी पद्धतीमध्ये मराठी भाषिकांना डावलण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी मुंबईतून सन २०१४ मध्ये ऑनलाइन रिक्षा लॉटरीमध्ये २६८७ इरादापत्रे- मागणीपत्रे देण्यात आली होती. त्यापैकी १५६० पक्के परवाने रिक्षाचालकांना देण्यात आले आहेत, तर ११२७ परवाने दीड वर्षांपासून देण्यात आलेले नाहीत. १५ वर्षांचे रहिवासी दाखले, शाळेचे दाखले, नवी मुंबईतील नसतानासुद्धा ते बोगस पद्धतीने बनवून त्याआधारे परप्रांतीय रिक्षाचालकांनी परवाने मिळविले आहेत, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष संतोष गाडे यांनी केला आहे. या वेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सदर परवानामध्ये महिला आरक्षणाबरोबर मराठी भाषिकांना न्याय देऊन रोजगाराच्या वाटा खुल्या करून देण्याची मागणी केली आहे.