scorecardresearch

‘पामबीच’वरून रिक्षाही भरधाव

रिक्षाचालकांची बेशिस्त आता भरधाव पामबीच मार्गावरही सुरू झाली असून त्यामुळे अपघात वाढू लागले आहेत.

वाहतूक नियमांना बगल; अपघातांत वाढ

नवी मुंबई : रिक्षाचालकांची बेशिस्त आता भरधाव पामबीच मार्गावरही सुरू झाली असून त्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. रविवारी या  मागार्वर झालेला अपघात हा यामुळेच घडला असून यात एक जण ठार तर चारजण जखमी झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील बेशिस्त रिक्षा  वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

परवानामुक्त धोरणानंतर नवी मुंबईत रिक्षांचे प्रमाण तिपटीने वाढले आहेत. परिणामी  वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. ‘आरटीओ’ने नुकत्याच केलेल्या कारवाईत हा गंभीर प्रकार समोर आला आहे. तीन दिवसात ७७ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली होती. शहरातील पामबीच मार्गावर वाहनांचा वेग हा भरधाव असतो. त्यामुळे वारंवार अपघात होत असतात.  वेगमर्यादा पाळली जात नाही. यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र त्यात सातत्य नसते. सिग्नल मोडणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.

त्यात आता रिक्षाचालक या मार्गावर चुकीच्या पद्धतीने वाहतूक करीत आहेत. यात मार्गिका बदल (लेन कटिंग) करताना नियम पाळले जात नसल्याने अपघात होत आहेत. याला वाहतूक पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. या मार्गावर रिक्षाचालक बेफामपणे रिक्षा चालवत असतात. मार्गिका बदल करताना मागील वाहनांचा अंदाज न घेता मध्येच घुसतात, असे  या मार्गावरून दररोज प्रवास करणारे प्रवाशी अनुराग शर्मा यांनी सांगितले. तर रिक्षा व्यवस्थीत चालवा अशी सूचना केली तर ते लगेच वाद घालतात. इतर रिक्षाचालक त्याच्या मतदतीला धावून येतात. रिक्षांच्या बेशिस्तीमुळे मी एकदा तोल जाऊन पडलो होतो, असे दुचाकीचालक संतोष गीते यांनी सांगितले. काही मोजकेच रिक्षाचालक बेशिस्तपणा करतात. मात्र त्यामुळे इतर प्रामाणिक रिक्षाचालकांना टीका सहन करावी लागते अशी खंत दीपक जाधव या रिक्षाचालकाने व्यक्त केली आहे.

रिक्षाचालकावर गुन्हा

 रविवारी पामबीच मागार्वर बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने अक्षर चौकातील सिग्नल तोडून उजवीकडे अचानक वळण घेतले. नेमके त्याच वेळी वाशीच्या दिशेने जाणारी फॉच्र्युनर कार समोर रिक्षा आली. रिक्षाला वाचवण्याच्या नादात फॉच्र्युनर कारचा मोठा अपघात झाला. त्यात नरेंद्र सिंग ऊर्फ समशेर सिंग याचा मृत्यू झाला तर विजय यादव हे गंभीर जखमी आहेत. तसेच अनुराग सिंग, दिनेश सिंग , सर्वेश मिश्रा हे किरकोळ जखमी आहेत. या प्रकरणी रिक्षाचालकावर अपघातास कारणीभूत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे.

वाहतूक कुठलीही असो, मार्गिका बदल करताना नियमानुसारच करणे आवश्यक आहे. अन्यथा ते आपल्या वा मागून येणाऱ्या वाहनचालकाच्या  जीवावर बेतू शकते. पामबीचवरील वाहनचालकांच्या बेशिस्तीवर नियमित कारवाई सुरू आहे. यापुढे ‘इ चलन’ कारवाईवर भर देण्यात येणार आहे.

-दत्ता तोटवडे, साहाय्यक आयुक्त, वाहतूक विभाग

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rickshaw road people riding accident ysh