पार्किंगचा पेच : नियोजनबद्ध शहरात रस्त्यांची कोंडी

मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी वाहनतळ नसल्याने वाहने कुठेही उभी केली जातात.

प्रत्येकाच्या दारी दुचाकी, चारचाकी गाडी पण पार्क करण्यासाठी जागा मात्र नाही. शहराच्या कानाकोपऱ्यात झालेली शाळा-महाविद्यालये, कार्यालये, वाणिज्य संकुले, औद्योगिक पट्टे, पण तिथे ये-जा करणाऱ्यांच्या वाहनांना वालीच नाही. पार्किंगसाठी पुरेशा आरक्षित जागा नाहीत, ज्या आहेत, त्यांचाही भलत्याच कारणांसाठी वापर, ही वस्तुस्थिती आहे. नियोजनबद्ध शहराचा टेंभा मिरवणाऱ्या, स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत उतरलेल्या नवी मुंबईच्या रस्त्यांची पार्किंगअभावी घुसमट होत आहे. गाडय़ांच्या गराडय़ातून वाट काढत नवी मुंबईकरांना रोज प्रवास करावा लागत आहे. शहरातील पार्किंगचा पेच विशद करणारी मालिका..

नवी मुंबई महानगरपालिकेने २००२ मध्ये पालिकेचे पार्किंग धोरण बनवले. पण हे धोरण सक्षम नसल्यामुळे आणि पालिकेने ते योग्य रीतीने न राबवल्यामुळे शहरात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे सक्षम पार्किंग धोरण तयार करणार असल्याची माहिती विश्वसीनय सूत्रांकडून मिळाली आहे.

मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी वाहनतळ नसल्याने वाहने कुठेही उभी केली जातात. परिणामी वाहतूक कोंडीने नवी मुंबईकर बेजार झाले आहेत. रो हाऊस, हॉटेल्स, रेस्टॉरण्ट्समध्ये वाहनतळांच्या जागांवर बेकायदा उद्योग चालवून त्यातून नफा उकळला जात आहे, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वाहतूक कोंडीची समस्या भीषण झाली आहे. पालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे उच्च न्यायलयाने नवी मुंबई महापालिकेवर नुकतेच ताशोरे ओढले. रात्री विमानप्रवास करताना केवळ गाडय़ांचे दिवे लखलखतात रस्त्यावरचे दिवेही दिसत नाहीत, अशी टिप्पणी करत वाहनतळांची समस्या दिवसेंदिवस भीषण होत असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले होते.

पार्किंगच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कष्ट घेतले जात नाहीत. शहरात ठिकठिकाणी नियोजनबद्ध वाहनतळांची सुविधा देत वाहतूककोंडीवर तोडगा काढून उत्पन्नात भर टाकण्याची संधी पालिका वाया दवडत आहे. लोकप्रतिनिधीही याबाबत आवाज उठवत नाहीत.

नवी मुंबईत सिडकोने आलिशान रेल्वे स्थानके उभारली आहेत. तिथे पे अ‍ॅण्ड पार्कची सोय करण्यात आली आहे, मात्र तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे वाहने सुरक्षित राहण्याबाबत साशंकता असल्यामुळे वाहनधारक तिथे वाहने पार्क करणे टाळतात. पे अ‍ॅण्ड पार्कमधून वाहनांमधील पेट्रोल चोरीला जात आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. सिडकोच्या वतीने पालिका क्षेत्रातील ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखरणे, वाशी, सानपाडा, तुभ्रे, जुईनगर, नेरुळ, बेलापूर या रेल्वे स्थानकांबाहेर पे अ‍ॅण्ड पार्क उभारण्यात आले आहे. स्थानकांच्या पूर्व व पश्चिमला वाहने पार्क केली जातात. प्रत्येक रेल्वे स्थानकांबाहेर २०० दुचाकी व १०० चारकचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था केली आहे. पण ही व्यवस्थादेखील शहरातील वाहनांच्या तुलनेत तोकडी आहे. सिडकोने शहराची आखणी करताना अंतर्गत भागांत वाहनतळांसाठी जागा ठेवली नसल्याने शहरात मिळेल त्या जागेत वाहने पार्क केली जातात.

नवी मुंबई महानगरपालिकेने केवळ १० ठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्कची व्यवस्था केली आहे. येत्या काळात ३९ ठिकाणी वाहनतळे साकारण्यात येणार आहेत. शहरात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास अस्ताव्यस्त पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना व रुग्णवाहिकांना तातडीने घटनास्थळी पोहचणे कठीण होते. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभाग व पालिकेने संयुक्त सर्वेक्षण करून नो-पार्किंग, सम-विषम पार्किंग, समांतर पार्किंग क्षेत्र घोषित केले आहे. त्यावर फलक लावण्याचे काम सुरू आहे. पण पालिकेकडून लावण्यात येणारे फलक शोभेचे ठरत आहेत.

५ लाख वाहनांची वर्दळ

नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या १४ लाखांच्या घरात आहे, मात्र बाजारपेठांचा परिसर, रहिवासी संकुले, औद्योगिक वसाहती येथे पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावरच पार्क करण्यात येतात. नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयात २००४ पासून सुमारे ४ लाख वाहनांची नोंद करण्यात आली आहे. १४ लाख लोकसख्ंयाच्या शहरात किमान पाच लाखांपेक्षा अधिक वाहनांची दैनंदिन वर्दळ असते. पालिका, एमआयडीसी व सिडको प्रशासनाने योग्य नियोजन न केल्याने शहरात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Road traffic in planned city

ताज्या बातम्या