अधिक शुल्क आकारले जात असूनही मागणीत वाढ

वाहनाच्या पाटीवरील व्हीआयपी क्रमांक मिरवण्याची नवी मुंबईकरांची हौस वर्षांगणिक वाढत असून त्यामुळे उपप्रादेशिक परिवहनच्या उत्पन्नात ९ महिन्यांत तब्बल ३ कोटी २८ लाख ५७ हजार रुपयांची भर पडली आहे. व्हीआयपी क्रमांकांसाठी जास्त शुल्क आकारले जात असले तरी त्यांची मागणी वाढतच आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ३९५५ व्हीआयपी क्रमांकांची विक्री करण्यात आली होती. त्यातून परिवहनच्या तिजोरीत ३ कोटी २८ लाख ५७ हजार रुपये जमा झाले आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ४३ हजार ४२२ वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी चार हजार ८९८ वाहनचालकांकडून व्हीआयपी नंबरची मागणी करण्यात आली. मात्र एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ४० हजार ६८३ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून ३९५५ वाहनचालंकडून व्हीआयपी नंबरची मागणी करण्यात आली आहे. त्यातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला ३ कोटी २८ लाख ५७ हजार रुपयांचा महसूल मिळाला. नवी मुंबईत व्हीआयपी क्रमांकांना राजकीय नेत्यांपासून उद्योजाकांपर्यंत कडून मोठय़ा प्रमाणात मागणी होत आहे, असे आरटीओच्या अधिकाऱ्याने सांगितले. काही वाहनचालक ज्योतिषांनी सुचवलेला क्रमांक मिळवण्यासाठी धडपडतात. चारचाकी वाहन चालकांकडून व्हीआयपी क्रमांकांना अधिक मागणी असते. या क्रमांकांसाठी ३ हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागते.

व्हआयपी क्रमांकांच्या किमतीत एप्रिल २०१७ पासून दीड पट वाढ झाली आहे. तरी व्हीआयपी क्रमांकांच्या मागणीत मात्र घट झालेली नाही. नोटाबंदीचा फटकादेखील व्हीआयपी क्रमांकांच्या मागणीला बसलेला नाही, असे आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी स्पष्ट केले.