नवी मुंबई- सिडको मध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विधानसभेत अनेकदा झाला. अनेकदा लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अधिकारी अडकले आहेत. आता तर बडतर्फ झालेल्या अधिकाऱ्याच्या चौकशीतून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सिडकोचा बडतर्फ प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी सागर तापडिया याने पगाराच्या तुलनेत पावणेदोनशे टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तापडिया आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नवी मुंबई लाच लुचपत विभागाने केली आहे.
सिडकोतील वादग्रस्त बडतर्फ अधिकारी यांच्या बेहिशोबी मालमत्ता बाबत चौकशी सुरु होती. बेहिशोबी मालमत्ता पत्नीचा नावे असल्याचे समोर आल्याने त्यांच्या पत्नीच्या विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको बडतर्फ अधिकारी सागर तापडिया याच्या पगाराचे एकूण उत्पन्न १ कोटी १२ लाख १७ हजार १४० रुपये इतके आहे. तापडिया याने आपली पत्नी मनीषा हिच्या नावावर १ कोटी ४२ लाख १७ हजार १४० रुपयांची मालमत्ता घेतलेली आहे.
एवढेच नाही तर त्याने १ कोटी ६४ लाख ४८ हजार ५२० रुपये खर्चही केले आहेत. सिडकोकडून मिळणारा पगार आणि तापडिया याने कमवलेली मालमत्ता याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. त्याने १ कोटी ९४ लाख ४७ हजार ९०५ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे निष्पन्न झाले आहे. पगाराच्या तुलनेत तापडिया याने मिळवलेली मालमत्ता ही १७३ टक्के जास्त आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ यांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घराची झाडाझडती सुरू
तापडिया याचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या राहत्या घराची झाडाझडती सुरू केली आहे. या झाडाझडतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तापडिया याने केलेल्या गैरव्यवहाराचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तापडियाच्या गैरव्यवहाराला त्याच्या पत्नीनेही सहकार्य केल्यामुळे तिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोचे कर्मचारी धास्तावले
अनेक अधिकाऱ्यांच्या दृष्टीने सिडको शहराचे शिल्पकार नसून पैसे खाण्याचे कुरण असल्याचे समजतात. अनेक अधिकार्यांनी नवी मुंबईसह अलिबागमध्ये कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. तापडियावर कारवाई करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पगार आणि मालमत्तेचा ताळमेळ तपासल्यामुळे सिडकोचे कर्मचारी धास्तावले आहेत. महागड्या गाड्या घेऊन सिडकोमध्ये येणार्या कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
