पनवेल : तळोजा वसाहतीमधील सेक्टर १५ मधील भूखंड क्रमांक ८ व ९ येथे मुस्लीम धर्मीयांच्या दफनभूमी उभारणीसाठी २ कोटी ४१ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच मुस्लीम धर्मीयांसह ख्रिस्ती दफनभूमी व हिंदू स्मशानभूमीची देखभालीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेच्या विविध सदस्यांनी महापौरांकडे केली. गेल्या १० वर्षांपासून तळोजा वसाहतीमध्ये मुस्लीम धर्मीयांना कुठे अंत्यविधी करायचा हा प्रश्न भेडसावत होता. दफनभूमी मिळावी यासाठी शेकाप, काँग्रेस व महाविकास आघाडीने या परिसरात भव्य मोर्चा काढला होता. सिडको मंडळाकडे ही समस्या मांडल्यानंतर त्याचा पाठपुरावा आ. बाळाराम पाटील, नगरसेवक हरेश केणी, आ. प्रशांत ठाकूर यांनी केला होता.
त्याचबरोबरच तळोजातील मुस्लीम बांधवांच्या ९ विविध संघटनांचे प्रतिनिधी यासाठी पाठपुरावा करीत होते. अखेर हा भूखंड पालिकेच्या हस्तांतरणात पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीने घेतल्यानंतर त्यावरील खर्चासाठी २ कोटी ४१ लाख ६३ हजार ५४७ रुपयांच्या तरतुदीबाबतचा प्रस्ताव मंगळवारी सर्वसाधारण सभेत मांडल्यानंतर सर्वच सदस्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
तळोजातील सर्वच मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन संयुक्त कमिटी बनविली असून त्या कमिटीव्दारे दफनभूमीचा कारभार चालविण्यास देण्याची मागणी पालिका सदस्यांनी केली. या प्रस्ताव सूचनेदरम्यान विविध वसाहतींमधील ख्रिस्ती समाजासाठी अंत्यविधीसाठी पालिकेने लक्ष देण्याची मागणी पालिका सदस्यांनी केली.
दफनभूमीवरील सुविधा
• तीन हजार ३३३ चौरस मीटर क्षेत्रावर दफनभूमी
• ४५० कबरींची क्षमता असणार आहे.
• प्रार्थनागृह, केअरटेकर खोली, स्वच्छतागृह, कार्यालय व नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था