महसूल विभाग पोलिसांची मदत घेणार

पनवेल तालुक्याच्या खाडीतील वाळू चोरणे यासह हत्या आणि दरोडा यासारखे गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या संतोष वर्मा या वाळूमाफियावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. पनवेलच्या महसूल विभागाने गेल्या आठ वर्षांत अनेकदा वर्मावर कारवाई केली आहे, मात्र त्याच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने वर्माचा बंदोबस्त करण्याचा विचार सरकार पातळीवर झाला आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या आदेशावरून पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी या कारवाईला सुरुवात केली आहे.
पनवेलच्या खाडीकिनारपट्टीवर वाळू उत्खननासाठी स्थानिकांच्या हातावर चिरीमिरी देऊन खाडीची किनारपट्टी ताब्यात घ्यायची आणि त्यानंतर तेथे बेकायदा वाळू उत्खनन सुरू करायचे, असा वाळूमाफियांचा उद्योग आहे. या उद्योगाला सुरुंग लावण्यासाठी पोलीस व महसूल विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
बेकायदा वाळूउपसा करण्यासाठी हे माफिया होडय़ांमध्ये सक्शन पंप आणि मजुरांचा ताफा खाडीत पाठवतात. या होडय़ा खाडीच्या मध्यवर्ती गेल्यावर पंपाने सुमारे ४० फूट खालची वाळू खेचून घ्यायची आणि अंधारात भरतीच्या वेळी होडय़ा खाडीकिनारी आणायच्या, अशी या माफियांची पद्धत आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय मजुरांचा वापर केला जातो. अशाच एका मजुराची हत्या केल्याप्रकरणी वर्मा व त्याच्या सहकाऱ्यांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या हत्येप्रकरणी सुरुवातीला संतोष व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांत संबंधित मजूर बेपत्ता झाल्याचा बनाव केला होता, मात्र संतोषचे बिंग फुटले.
वर्मा याच्यावर ठाणे, बेलापूर, खारघर, पनवेल अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाळूचोरीचे एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये महसूल विभागाचे काही मंडळ अधिकारी आणि वाहनचालकांचेही हात ओले झाले आहेत. त्यांच्याच आशीर्वादामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांना महसूल विभागाच्या कारवाईचा आधीच सुगावा लागतो. मात्र तहसीलदार दीपक आकडे यांनी या छाप्यांबाबत गोपनीयता बाळगण्याचे तंत्र अवलंबले आहे. बेकायदा वाळूचा उपसा पूर्णपणे रोखण्यासाठी खाडीकिनारी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत.