पनवेल – मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे, टोलवसुली आणि रायगड जिल्ह्यात वसविलेली जात असलेली तीसरी मुंबई प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत, ‘इतक्या वर्षांपासून नेतृत्व असूनही रायगडमधील मूलभूत प्रश्न का सुटले नाहीत, काय झक मारताय का’ असा संतापजनक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बुधवारी पनवेल येथे केला.
रायगड जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आयोजित पत्रकार परिषदेत देशपांडे पनवेल येथे बोलत होते. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव, कोलाड आणि इंदापूर येथे सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना तासन्तास रस्त्यावर थांबावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
“टोलवसुलीला आमचा विरोध नाही. मात्र, प्रवाशांना अपेक्षित सुविधा न देता आणि रस्त्यांची दुरवस्था कायम ठेवून टोल घेण्याचे औचित्य काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. टोल नाक्यांवर स्थानिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
रायगडचे प्रतिनिधित्व करणारे अनेक वरिष्ठ नेते सत्तेत असतानाही जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळालेली नाही, अशी टीका करत त्यांनी सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांचा उल्लेख केला.या सर्व मुद्द्यांवर मनसे पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले. “संघर्षातूनच मनसे उभा राहिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील टोलविरोधातील लढा यापुढेही सुरू राहील,” असे त्यांनी सांगितले. तीसरी मुंबई करण्यासाठी राज्य सरकारने तीन कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार केला. तीस-या मुंबईला मनसेचा विरोध नाही. मात्र स्थानिक भूमिपूत्रांना या प्रकल्पात डावलले जाऊ नये अन्यथा या प्रकल्पाला मनसेचा विरोध असेल यासाठी लवकरच रायगड जिल्हाधिका-यांची भेट घेणार असल्याचे देशपांडे यांनी सांगीतले. रायगडमधील पायाभूत सुविधांबाबत शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा जनतेच्या प्रश्नांसाठी मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
