नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकांची धामधूम संपताच शहरातील राजकीय प्रवाहातून पुन्हा काही काळ अलिप्त झालेले माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडे पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची सुत्र सोपवली जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिकेत एकहाती सत्ता मिळूनही गेल्या पाच महिन्यांपासून प्रभागातील कामे खोळंबली असल्याच्या तक्रारी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक करु लागले असून वन मंत्री गणेश नाईक यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत काही नगरसेवकांनी आपले गाऱ्हाणे मांडल्याचे समजते. या बैठकीतच नाईक यांचे संदीप यांनी याकडे लक्ष द्यावे असे स्पष्ट संकेत दिल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.
विशेष म्हणजे, मंगळवारी संदीप यांच्या वाढदिवसाचे निमीत्त साधत त्यांच्या समर्थकांनी गेल्या आठवडाभरापासून लोकपयोगी कार्यक्रमांचा धडाका शहरात लावला असून येथील राजकीय वर्तुळात ते पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत यानिमीत्ताने मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संदीप यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेसमधून निवडणुक लढविली. बेलापूर विधानसभा क्षेत्रात त्यांचा जेमतेम ३७४ मतांनी पराभव झाला. यानंतर बराच काळ ते सक्रिय राजकारणातून लांब असल्याचे पहायला मिळाले. राज्यात भाजप महायुतीचे सरकार स्थापन होताच गणेश नाईक यांची मंत्री मंडळात वर्णी लागली. त्यानंतरही बराच काळ संदीप पक्षीय राजकारणापासून अलिप्त दिसले. जानेवारी महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मात्र त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात ही निवडणुक लढविण्याचे भाजपने निश्चित करताच स्थानिक पातळीवर संपूर्ण सुत्र गणेश नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली. या रणनितीचा एक भाग म्हणून संदीप यांना पक्ष प्रवेश देत भाजपने नाईक यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर महापालिकेतील सत्तेची सुत्र कोणाकडे असतील याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. नाईक यांनी आपले पुतणे आणि माजी महापौर सागर यांच्याकडे महापालिकेतील सत्तेची सर्व सुत्र सोपविल्याचे पहायला मिळाले. गेली पाच महिने महापालिकेत सागर म्हणतील तीच पुर्वदिशा असा कारभार असताना नगरसेवकांची गाऱ्हाणी सोडविण्याची जबाबदारी संदीप नाईक यांच्याकडे सोपवून गणेश नाईक यांनी त्यांना पुन्हा सक्रिय होण्याच्या सूचना केल्याचे समजते.
सामाजिक कार्यक्रमातून वातावरणनिर्मीती
संदीप यांच्या मंगळवारी असलेल्या वाढदिवसाच्या निमीत्ताने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण शहरभर जोरदार वातावरणनिर्मीती केली असून वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांचा धडाका लावण्यात आला आहे. यंदा आपल्या वाढदिवस सामाजिक कार्यक्रमातून साजरा केला जावा असे आवाहन संदीप यांनी केले होते.
नवी मुंबई हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू ठरविण्यात आला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजप आणि संदीप समर्थकांनी महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबीरे, योग साहित्य वितरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम तसेच रक्तदान शिबीरांसारखे कार्यक्रमांचे यानिमीत्ताने मोठया प्रमाणावर आयोजन केल्याचे दिसत आहे. याशिवाय शहरातील जवळपास सर्वच प्रमुख ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे फलक उभारण्यात आले असून ही राजकीय वातावरण निर्मीती सध्या चर्चेत आली आहे. मंगळवारी वाढदिवसानिमीत्त आपण दुर्गभ भागात सामाजिक कामांसाठी जाणार असल्याचे स्वत: संदीप यांनी जाहीर केले असले तरी महापालिकेतील अंतर्गत राजकारणातही ते येत्या काळात सक्रिय होण्याचे संकेत यानिमीत्ताने मिळू लागले आहेत.
