अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सानपाडा येथील दत्तमंदिर शेजारी संरक्षक भिंत उभी करणाऱ्याचे काम आजपासून सुरु झाले असून रखडलेल्या सेवा रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या दोन्ही कामांनी सणांच्या वेळी शीव पनवेल मार्गावर होणारी वाहतूक कोंडीपासून मुक्तता होणार आहे. या कामांचा शुभारंभ आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. नवी मुंबईतील जागृत देवस्थान म्हणून सानपाडा येथील दत्तमंदिर मानले जाते. दत्त जयंती व इतर हिंदू धर्मियांच्या सणांना भक्तांची प्रचंड गर्दी याठिकाणी होते, मात्र मंदिर नेमके शीव पनवेल या राज्यातील सर्वाधिक व्यस्त महामार्गानजीक असल्याने अनेक लोक महामार्गावरच गाड्या पार्क करून मंदिरात येतात. तसेच मंदिरात जाण्यातही याच मार्गावरून ये जा करत असल्याने हिंदू सण आणि त्यातल्या त्यात दत्त जयंती वेळी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून या ठिकाणी सेवा रास्ता आणि संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी होत होती. हेही वाचा - तळोजात पालिकेचा दवाखाना लवकरच, पनवेल पालिका आरोग्य विभागाची माहिती सेवा मार्गाने भक्तांची ये जा करण्याची सोय होईल तर संरक्षण भिंतीमुळे शीव पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडीला चाप बसेल. मात्र आतापर्यंत ही मागणी पूर्ण होत नव्हती. कसेबसे मनपाद्वारे सेवा रस्त्याचे काम सुरु झाले, मात्र महिन्यापूर्वी मध्येच रखडले. नवी मुंबई मनपा आणि सार्वजनिक विभाग यांच्यात आमदार मंदा म्हात्रे यांनी समन्वय घडवल्याने काम मार्गी लागले. शुक्रवारी या कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनपा कर्मचारी तसेच सानपाडा ग्रामस्थ व भक्तांच्या उपस्थितीत आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. दत्त जयंतीला होणारी शीव पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी आता होणार नाही, तसेच सेवा रस्त्याने भक्तांना येथे सहज येता येईल या शिवाय संरक्षक भिंतीमुळे शीव पनवेल मार्गापासून मंदिर वेगळे झाल्याने हवा आणि ध्वनी प्रदूषण यापासून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. हेही वाचा - तळोजात पालिकेचा दवाखाना लवकरच, पनवेल पालिका आरोग्य विभागाची माहिती दोन महिन्यांत सेवा मार्गाचे काम संपेल असा विश्वास शहर अभियंता संजय देसाई यांनी व्यक्त केला. संरक्षक भिंत बांधल्याने शीव-पनवेल मार्गावर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे. काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओमप्रकाश पवार यांनी दिली.