नवी मुंबई – नवी मुंबई शहरात मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सानपाडा येथील प्रतीक सीएचएस या प्लॉट नंबर ४ सेक्टर-१ या बिल्डिंगच्या दुकाने व अभिमन्यू सीएचएस प्लॉट नंबर ३ सेक्टर १ सानपाडा या बिल्डिंगच्या ३ दुकानांपैकी प्रतीक सीएचएसच्या दुकान नंबर १ मध्ये ब्लास्ट झाला. त्यामुळे ६ दुकानाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे. या दुर्घटनेत दोन व्यक्ती गंभीर जखमी झालेले असून त्यांना नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
या ठिकाणी झालेल्या स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने याच इमारतीच्या समोरील रुग्णालयाच्या काचाही फुटल्या असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिलेली आहे. गंभीर जखमी झालेल्या अरुण यादव ( वय २६) व अर्जुन यादव ( वय ४६) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना महापालिकेच्या वाशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सानपाडा येथील प्रतीक या व्यावसायिक इमारतीमधील दुकानांमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. परंतु खाद्य दुकानात असलेले ३ सिलेंडर सुस्थितीत असल्याचे दिसत आहेत .यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नक्की हा प्रकार कशामुळे झाला याबाबत पोलीस विभाग अधिक माहिती घेत आहेत . – पुरुषोत्तम जाधव, अग्निशमन विभाग अधिकारी वाशी
