School Vision school bus not reached in Bonesari village navi Mumbai ysh 95 | Loksatta

‘स्कूल व्हिजन’ दूरच ‘स्कूल बस’ सुद्धा न पोहचलेले गाव बोनसारी

नवी मुंबई महानगर पालिकेने राबवलेला “स्कूल व्हिजन” उपक्रमाचे राज्यात सर्वत्र कौतुक झाले मात्र हे स्कूल व्हिजन बोनसारी गावा पर्यत अद्याप पोहचलेच नाही.

School Vision Bonsari is a village not even reached by school bus
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेने राबवलेला “स्कूल व्हिजन” उपक्रमाचे राज्यात सर्वत्र कौतुक झाले. मात्र हे स्कूल व्हिजन बोनसारी गावापर्यंत अद्याप पोहचलेच नाही. स्कूल व्हिजन सुरु होऊन सुमारे दहा वर्षापेक्षा अधिक काल लोटून गेला. तरी या गावातील विद्यार्थांना तीन चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. तर प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना शेअर रिक्षा शिवाय पर्याय नाही, आणि अद्याप येथील विद्यार्थ्यांपर्यंत एनएमएमटीची स्कूल बस पोहचली नाहीच शिवाय तशी तसदी मुख्याध्यापकांनी घेतलीही नाही.  

नवी मुंबई महानगर पालिकेने स्कूल व्हिजन उपक्रमांतर्गत अद्यावद शाळा उभ्या केल्या. विशेष म्हणजे राज्यातील इतर मनापा व नगरपरिषद शाळेत विद्यार्थी गळती असताना नवी मुंबई मनपा शाळेत मात्र दर वर्षी विद्यार्थी प्रवेशात वाढ येत आहे. आणि विशेष म्हणजे गुणवत्ता तख्त्यात मनपा शाळेच्या विद्यार्थांचा समावेश असतो. असे असले तरीही एमआयडीसी भागातील अनेक गावात स्कूल व्हिजन पोहचलेच नाही.यात बोनसारी गावाचा समावेश आहे. सुमारे एक हजार झोपड्यांची वस्ती असलेल्या गावात शाळा नाही. याच परिसरात चुनाभट्टी गावातही शाळा नाही.

हेही वाचा >>> तेरणा रुग्णालय : “कामगारांना भविष्य निर्वाह निधी, थकीत वेतन आणि पगारी रजा नाही”; इंटक संघटनेचा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा

विद्यार्थी संख्या कमी असल्याने शाळा नसल्याचे सांगितले जाते. याच ठिकाणापासून सर्वात जवळची शाळा इंदिरानगर येथील मनपा शाळा असून सुमारे दोन अडीच किलोमीटर लांब आहे. तर माध्यमिक शाळेसाठी थेट तुर्भे गाठावे लागते जे अंतर साडेचार किलोमीटर दूर आहे. या ठिकाणी तीनशे ते चारशे विद्यार्थी असल्याचा दावा स्थानिक नागरिक करतात. विद्यार्थांना ने आण करण्यासाठी रिक्षा शिवाय पर्याय नाही. महिन्याला त्याचा खर्च किमान एक हजार ते बाराशे होतो. अशी माहिती विलास घोरपडे या रहिवाशाने दिली. त्यामुळे एनएमएमटीची स्कूल बस सुरु करण्यात यावी अशी मागणी जोर धरीत आहे. अशी मागणी अद्याप आली नाही परिस्थिती पाहून एनएमएमटी प्रशासनाकडे मागणी केली जाईल अशी माहिती माजी नगरसेवक सुरेश कुळकर्णी यांनी दिली.

या ठिकाणी खदानीत काम करणाऱ्या कामगारांची वस्ती आहे.. त्यात रोजच काम मिळेल याची शाश्वती नसते त्यामुळे महिन्याकाठी शाळेत ये जा करण्यासाठी हजार बाराशे रुपये सुद्धा खूप मोठी रक्कम वाटते. त्यात शिक्षणाचे महत्व कमी असल्याने शाळेत पाठवण्यासाठी महिन्याला येणाऱ्या खर्च पेलत  नसल्याने शाळा बाह्य मुलांची संख्या वाढू शकते. अशी भीती स्वावलंबी सामाजिक सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी व्यक्त केली. योगेश कडुस्कर (एनएमएमटी व्यवस्थापक व उपायुक्त शिक्षण विभाग) ज्या ठिकाणी एनएमएमटीची स्कूल बस सेवा पाहिजे आहे त्या ठिकाणच्या शाळेकडे मागणी केल्यावर तेथील मुख्याध्यापकांचे पत्र प्राप्त होताच स्कूल बस सुरु केली जाईल. या बाबत परिस्थिती संख्या आदी सर्वेक्षण करून योग्य ती पाउले उचलली जातील.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 13:32 IST
Next Story
तेरणा रुग्णालय : “कामगारांना भविष्य निर्वाह निधी, थकीत वेतन आणि पगारी रजा नाही”; इंटक संघटनेचा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा