शिक्षण व आरोग्य विभागाशी चर्चेअंती महापालिका आयुक्तांचा निर्णय

नवी मुंबई : करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूमुळे मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थावर टाकला होता. मंगळवारी नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर शहरातील  शाळा या १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या शहरातील प्रसाराची काय परिस्थिती असेल हे पुढील पंधरा दिवसांत समोर येईल. यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या शहरी भागांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत. आता १ डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला होता. आरोग्य विभागाने आणि डॉक्टरांच्या कृतिगटाने त्यास संमती दिली होती. मात्र, ओमायक्रॉनच्या भीतीमुळे प्राथमिकच्या शाळा सुरू करायच्या की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राज्य शासनाने सोमवारी शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे जाहीर केले. मात्र मुंबई महानगर क्षेत्राबाबत तेथील स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा असे शासनाने सांगितले होते.

मंगळवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य, शिक्षण विभागाची दुपारी बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य विभागाबरोबर चर्चा करण्यात आली. ओमायक्रॉन तीव्रता, त्याचा संसर्ग, प्रसार याची महिती घेण्यात आली. त्यामुळे पुढील कालावधीत ओमायक्रॉनची तीव्रता काय राहील याबाबत अधिकची माहिती समोर येईल. त्यामुळे शाळा १ डिसेंबरपासून सुरू न करता १५ डिसेंबरपासून सुरू होतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

१ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याची तयारी होती. मात्र महापालिका आयुक्तांनी १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढील आदेशानुसार शाळा सुरू करण्यात येतील.

सुधीर थळे, मुख्याध्यापक, राफनाईक विद्यालय

मुलांचे अवघे चार महिने शैक्षणिक वर्ष राहिले आहे. अद्याप करोनाचा संसर्ग टळला नसून नवीन प्रकार समोर येत आहे. तसेच हवामान बदल यामुळे मुले आजारी पडत असतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मुलांना शाळेत पाठविण्यास सहमत नाही.

अमित बांधकर, पालक  कोट

आमच्या मुलांना या करोनाच्या नवीन प्रकारामुळे शाळेत पाठवण्यास तयार नाही. जोपर्यंत त्यांची लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांना शाळेत पाठविण्याला आम्ही सहमत नाही.

-सतीश शंकरन, पालक

पालकांकडून स्वागत

१ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र ओमायक्रॉनमुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? याबाबत संभ्रम होता. पालिका आयुक्तांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांना दिलासा मिळाला असून त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागासहीत शिक्षण विभाग यांची बैठक घेत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा केली. यामध्ये सध्या आफ्रिकेतून मुंबई, पुण्यामध्ये नागरिक येत आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग, त्याचा प्रसार, तीव्रता याचा अभ्यास, माहिती घेण्यात येत आहे. दक्षता म्हणून शाळा उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जयदीप पवार, शिक्षण अधिकारी, नवी मुंबई महापालिका