नवी मुंबई : गेल्या आठवड्यात नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. यावर अद्याप तरी मोठे आक्षेप घेतलेले दिसत नाहीत. मात्र यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय मतदार यादीची छाननी सुरू केली आहे.गेली दोन वर्षे रखडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक आगामी काळात जाहीर होऊ शकते. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक पूर्वप्रक्रियेला वेग आला असून प्रभाग रचना, आरक्षण जाहीर केल्यानंतर आता मतदार यादीही जाहीर करण्यात आल्या आहेत.
या सर्व प्रक्रियेनंतर इच्छुकांना आता मतदार पेरणी करता येणे शक्य आहे. त्यानुसार काम सुरू झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना प्रभाग निहाय मतदारांची छाननी करण्याचे आदेश दिले आहेत.
पालिकेने गुरुवारी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या असून आगामी पालिका निवडणुकीत ८,४५,५२४ एकूण मतदार निश्चित करण्यात आले असून प्रभागनिहाय ४१ प्रभागांच्या मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या सर्व शाखांमध्येही पोहचवण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांवर १ जुलैपर्यंत हरकती व सूचना घेता येणार आहेत त्यामुळे अवधी अत्यंत कमी असल्याने सर्वांनीच कामाला लागण्याचे आदेश सर्वच पक्षांनी दिले आहेत. १ जुलैपर्यंतची हरकत घेण्याची मुदत असल्याने मतदार यादी तपासणीची लगबग पक्षीय कार्यकर्त्यावर देण्यात आली आहे.




निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मतदार याद्या तत्काळ सर्वांपर्यंत पोहचवण्यात आल्या असून शिवसेना कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारांची नावे तपासून घ्यावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.- विजय नाहटा, शिवसेना नेते
पालिकेने प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांबाबत योग्य पद्धतीने अभ्यासपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. प्रभागातील नागरिकांना आपले मतदार यादीतील नाव तपासून घेण्यासाठीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.-विजय साळे, पदाधिकारी भाजपा</strong>