बेलापूर किल्ल्याचा दुसरा बुरूज कोसळण्याच्या स्थितीत

२००७ मध्ये याच बुरुजाखालील दरड घरांवर कोसळली होती. यात काही जण जखमीही झाले होते.

सीबीडी सेक्टर १५ येथील रहिवाशांना धोका

शेखर हंप्रस

नवी मुंबई : बेलापूर किल्ल्याचा टेहळणी बुरूज कोसळल्यानंतर या किल्ल्याच्या इतर बुरुजांची दुरवस्थाही समोर येऊ लागली आहे. सीबीडी सेक्टर १५ येथील बुरूजही कोसळण्याच्या स्थितीत असून येथील रहिवाशांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. रहिवाशांनी यापूर्वीच सिडको प्रशासनाला योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे २००७ मध्ये याच बुरुजाखालील दरड घरांवर कोसळली होती. यात काही जण जखमीही झाले होते. यावेळी या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप ही उपाययोजना करण्यात न आल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

शनिवारी महापालिका मुख्यालयासमोरील बेलापूर किल्ल्याचा टेहळणी बुरुजाचा मोठा भाग अचानक कोसळला. विशेष म्हणजे या किल्ल्याचा २०१८ पासून संवर्धनाचे काम सुरू आहे, असे असतानाही ही पडझड सुरू झाल्याने दुर्गप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

याच किल्ल्याचा अन्य एक बुरूज जो सिडको गेस्ट हाऊसच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरावर आहे. हा बुरूजही ढासळण्याच्या मार्गावर आहे. या बुरुजावर पिंपळाचे झाड उगवले असल्याने बुरूज खिळखिळा झालेला आहे. ज्या भागात पिंपळाचे झाड उगवले आहे त्याच भागाखाली सीबीडी सेक्टर १५ ए असून या ठिकाणी स्वाती सोसायटी व अन्य काही घरे आहेत. टेहळणी बुरूज कोसळल्यानंतर येथील रहिवाशांची झोप उडाली आहे. बुरूज बांधकामात चिरे आणि शिळा असल्याने धोका अधिक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवासी मनोज भोईर यांनी केली आहे.  या ठिकाणी एक जाळी लावण्यात आलेली आहे, मात्र ही जाळी तकलादू आहे.  बुरुजावर संवर्धनअंतर्गत काही बांधकाम केले असून तेही निकृष्ट दर्जाचे असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

सिडकोकडून दुर्लक्ष

२००७ मध्ये याच बुरुजाखालील दरड थेट येथील काही घरावर, रस्त्यावर कोसळली होती. यात काही जण जखमीही झाले होते. त्यामुळे बुरुजाचा पायाही कमकुवत झालेला आहे. यावेळी सिडकोने संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप काहीही उपायोजना झालेली नाही. शनिवारी टेहळणी बुरूज पडल्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी केली. यावेळी रहिवाशांनी मागणी केल्यानंतर त्वरित संरक्षित मजबूत जाळी बांधू असे सांगण्यात आले. मात्र अद्याप काहीही हालचाल केली नसल्याचे रहिवासी संतोष गोळे यांनी सांगितले.

किल्ले बेलापूर येथील सर्व पुरातन बांधकामाचे तपासणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी जशी परिस्थिती आहे, त्याप्रमाणे त्वरित योग्य ती पावले उचलली जाणार आहेत.

-प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Second tower belapur fort state collapse akp

ताज्या बातम्या