तीस हजार घरे विक्रीविना पडून; नवी मुंबईत पहिल्या आर्थिक तिमाहीत केवळ २६ घरांची विक्री झाल्याचा अंदाज
नवी मुंबई : गेल्या वर्षी करोनाकाळातही घरांची विक्री झालेल्या महामुंबई क्षेत्रात यंदा मात्र पहिल्या आर्थिक तिमाहीत घट झाल्याचे दिसून आले आहे. ही घट देश पातळीवर असून त्याचा फटका महामुंबईलादेखील बसला आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात सुमारे १२५ विकासकांनी विविध छोटे-मोठे गृह प्रकल्प हाती घेतले आहेत. यात विमानतळ प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या साडेबावीस टक्के भूखंडांचा पुष्पकनगर या सिडकोच्या वेगळ्या नोडमध्ये मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. नवी मुंबईत तीस हजार घरे आजही विक्रीविना पडून असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
मुंबईच्या मध्य तसेच पश्चिम भागांपेक्षा सध्या रेल्वेच्या हार्बर मार्गिकेवर मोठय़ा प्रमाणात नागरिक घरांना पसंती देत आहेत. सिडकोने दोन वर्षांत दोन लाख घरे बांधण्याचे जाहीर केले आहे. त्याच वेळी एक दोन वर्षांत विमानतळावर मालवाहतूक तरी सुरू केली जाणार आहे. बेलापूर ते पेंदार हा मेट्रो मार्ग वर्षांअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामुंबई क्षेत्रात घर घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे.
महामुंबई क्षेत्रात घरांची चौकशी झाली आहे पण एप्रिल ते जून या तिमाहीत मात्र घरांच्या विक्रीत घट झाली आहे. मुंबईत यंदा पहिल्या तीन महिन्यांत ५८२१ घरे विकली गेली आहेत. ही वाढ पहिल्या तीन महिन्यांपेक्षा ४२ घरांनी जास्त आहे. या उलट नवी मुंबईत मात्र करोनाच्या या दुसऱ्या लाटेत केवळ २६ घरांची विक्री झाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
येत्या काळात स्टील आणि सिमेंट यांच्या दरात वाढ होणार असल्याने घरांच्या किमतीत देखील दरवाढ होण्याची विकासक व्यक्त करीत आहेत. सिडकोच्या घरांना चांगली मागणी असून सिडको या करोनाकाळात दरवाढ न करता सध्या अस्तित्वात असलेल्या किमतींपेक्षा कमी दरात घरे विकण्याची शक्यता असून सिडकोला जमिनीची किंमत मोजावी लागत नसल्याने सिडकोला खासगी विकासकांपेक्षा कमी दरात घरे विक्री करणे शक्य आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेत अनेक व्यवहार ठप्प असल्याने लाट ओसरतच ते पूर्ण झाल्याने घरांचे व्यवहार काही काळापुरते जास्त दिसत होते. मात्र करोनामुळे घरविक्रीवर परिणाम कायम आहे. दुसऱ्या लाटेतही घरविक्री अल्प प्रमाणात झालेली आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात सुमारे पाचशे गृहप्रकल्प पूर्णत्वास आले असून त्यांच्यात सुमारे ३० ते ४० हजार घरे अजूनही विक्रीविना पडून आहेत,
-प्रकाश बाविस्कर, अध्यक्ष, ‘क्रेडाई’, नवी मुंबई</strong>
