वृद्धांना घरात सन्मान द्या, तरच आपला समाजात सन्मान होईल तसेच संयुक्त कुटुंबीय पद्धतीपासून आजची पिढी दूर जात असल्याची खंत गुरुवारी कामोठे येथे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. कामोठे येथील ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राच्या लोकार्पण सोहळ्या वेळी चव्हाण बोलत होते. या विरंगुळा केंद्रामधील ज्येष्ठांसाठी वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी सिडको प्रशासन भविष्यात प्रयत्न करणार असल्याची घोषणा यावेळी सहव्यवस्थापक चव्हाण यांनी केली. यामुळे भविष्यात या केंद्रातून थरथरत्या हातांना मायेचा आधार मिळणार असल्याची भावना उपस्थित ज्येष्ठांनी व्यक्त केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सेक्टर २० येथील उद्याणामध्ये या विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. सुमारे दोनशे ज्येष्ठ नागरिक साडेनऊ वाजल्यापासून येथे हजर होते. मान्यवरांच्या सत्कारासाठी येथे सिडकोने पुष्पगुच्छासोबत पुस्तक आठवण म्हणून भेट देऊन या सोहळ्याला वेगळेपण आणून दिले. आमदार ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिक संस्थेने कामोठे येथे उद्यान व विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी सिडकोकडे केलेल्या पाठपुराव्याबद्दल संस्थेचे एन. एस. करंदीकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या सोहळ्यात कौतुक केले.