राज्य महामार्ग वाहतूक पोलीस विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र वारे याला कळंबोली येथील त्यांच्या दालनात उपनिरीक्षकांकडून १ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना दोन दिवसांपूर्वी पालघर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. परंतू पोलीस बीट (पोलीस केंद्र) कायम स्वरुपीचे नेमणूक आदेश काढण्याचे अधिकार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नसताना वारे यांनी लाचेची रक्कम कोणासाठी स्विकारली अशी चर्चा पोलीस दलात सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे बीट न मिळाल्याने त्यांनी वैतागून पोलीस दलात पोलीस आपसात सूरु असलेली लाचखोरी उघडकीस आणली.

हेही वाचा >>> नवी मुंबई : करळ पुलावर एन.एम.एम.टी. बस व वँगनरची धडक; चालक जखमी

वारे यांच्या अटकेनंतर नेमणूकीचे आदेश काढणा-या महामार्ग पोलीस दलातील बड्या अधिका-यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे याचीच चर्चा पोलीस दलात सूरु आहे. कळंबोली महामार्ग वाहतूक पोलीस विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची कार्यकक्षा थेट महाड, लोणावळा व खोपोलीपर्यंत आहे. महाड, पळस्पे, खालापूर व वाकण असे चार पोलीस केंद्र आहेत. याच केंद्रावर पोलीस उपनिरीक्षकांना कायम स्वरुपाचे नेमणूकीचे आदेश मिळाल्यास त्या पोलीस केंद्रातील महामार्गांवरील वाहतूकीची ‘जबाबदारी’ संबंधित पोलीस उपनिरीक्षकांची असणार असल्याने ‘जबाबदारी’ आपल्याच पडावी यासाठी उपनिरीक्षकांमध्ये स्पर्धा लागल्याने बदलीसाठी लाचेची मागणी झाल्याचे बोलले जात आहे. लाचेच्या प्रकरणात अटकेत असलेले पोलीस अधिकारी वारे हे अतिरीक्त पोलीस महासंचालक कार्यालयाच्या निकटवर्तीय असल्याने उपनिरिक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पोलीस केंद्र कायमस्वरूपी नेमणूकीचे आदेश काढण्यात त्यांचा वापर केला जात होता अशी चर्चा पोलीस सूरु आहे. या संपूर्ण लाच प्रकरणात या विभागाचे अतिरीक्त पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.