नवी मुंबई : रविवार, २७ जून रोजी देशभरात पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई महापालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रांच्या वतीने विविध ठिकाणी पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. शहरातील सात हजार बालकांना पोलिओ लस देण्यात आली.

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी ६०७ स्थायी बूथ तसेच रेल्वे स्थानक, बस डेपो, मॉल, डी’मार्ट अशा ९२ ठिकाणी, तसेच अस्थायी बूथ तसेच दगडखाणी, उड्डाणपुलाखाली, रेल्वेलगत असलेल्या झोपडय़ा, बांधकाम ठिकाणे अशा ठिकाणी २८ मोबाइल बूथ अशा प्रकारे विविध जागी एकूण ७२६ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. पाच वर्षांखालील साधारणत: ८७ हजार लाभार्थी बालके नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.

सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत दिवसभरात नवी मुंबई  महानगरपालिका क्षेत्रात ५ वर्षांखालील ६० हजार ९७१ बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. कोविड काळातही पोलिओ लसीकरण मोहीम होत असल्याने आणि त्यातही पाच वर्षांखालील लहान बालकांना हे लसीकरण केले जात असल्याने सर्व बूथवर कोविड प्रतिबंधात्मक सुरक्षा बाबींचे पालन करण्यात आले. त्यास अनुसरून सर्व बूथसमोर सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली होती. बूथवर हात धुण्याची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. मुखपट्टी आणि हातमोजे यांचा वापर लसीकरण प्रक्रियेत सहभागी स्वयंसेवकांना अनिवार्य करण्यात आला होता.