सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त वाढवल्याने ग्रामस्थ संतप्त

उरण : नवी मुंबई सेझ कंपनीच्या ताब्यात असलेल्या येथील पाणथळीच्या भूखंडाचा प्रश्न ऐरणीवर आला असून सेझ कंपनीने आपल्या ताब्यातील बोकडविरा गावाच्या परिसरातील भूखंडांवर प्रवेशबंदीचे फलक लावले आहेत. तसेच सुरक्षारक्षकांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. यामुळे खेळाची मैदाने, नागरिकांचा वावर यासह मासेमारीवरही मर्यादा येणार आहेत. यामुळे येथील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. उद्योगांची निर्मिती करून रोजगार उपलब्ध करण्यासाठी सेझची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी असताना हा प्रकार सुरू आहे. 

सिडकोने नवी मुंबईच्या विकासासाठी उरणमधील ९ हजार १०० हेक्टर जमीन संपादित केली असून यातील ३ हजार एकर जमीन २००६-०७ मध्ये नवी मुंबई सेझ कंपनीच्या उभारणीसाठी रिलायन्सला दिली आहे. ही जमीन बोकडविरा, फुंडे, डोंगरी, पाणजे तसेच भेंडखळ, नवघर, पागोटे व कुंडेगाव परिसरांत आहे. यामध्ये रिलायन्स ६७ टक्के, तर २३ टक्के भागीदारीत आहे. यामागील मुख्य उद्देश या सेझच्या माध्यमातून या परिसरात उद्योगांची उभारणी करण्यात येणार होती. मात्र मागील पंधरा वर्षांत एकही उद्योग उभा राहिला नाही. उलटपक्षी सेझ म्हणून सिडकोकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीला सेझकडून दहा फुटांच्या भिंती टाकण्यात आल्या आहेत. यामुळे पाणजेसारख्या गावाला चारही बाजूंनी या भिंतींनी वेढले आहे, तर अनेक गावांत ये-जा करण्यासाठी असलेले रस्तेही याच परिसरातून जात आहेत. तसेच पारंपरिक पद्धतीने होणारी मासेमारीची अनेक ठिकाणेही याच भागात आहेत. भिंतीच्या परिसरात सध्या नागरिकांना प्रवेश आहे. तसेच बोकडविरा, पागोटे, पाणजे, डोंगरी आदी परिसरांतील मोकळय़ा जागेवर मुले खेळत असतात. त्यांना सध्या बंदी घातली जात नसली तरी फलकावर बंदी असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे फलक ही सुरुवात असल्याची भीती उरणमधील नागरिक सुभाष पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सेझसाठी ३ हजार एकर

उरणमधील ३ हजार एकर जमीन २००६-०७ मध्ये नवी मुंबई सेझ कंपनीच्या उभारणीसाठी रिलायन्सला दिली आहे. सिडकोने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या असून त्या सेझ कंपनीला देताना उद्योग व रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने सरकारच्या नव्या धोरणानुसार ज्या कारणासाठी जमिनी संपादित केल्या होत्या, त्यासाठी त्याचा वापर न झाल्याने त्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत करण्याच्या तरतुदीनुसार सिडकोने या जमिनी परत कराव्यात.

– रामचंद्र म्हात्रे, किसान सभा, जिल्हाध्यक्ष

सिडकोने सेझ कंपनीला भाडेतत्त्वावर या जमिनी दिल्या असून त्या साठ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्यांचा भाडेकरार संपलेला नाही.

– प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको