शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

देशातील वस्तू व सेवाकर इतर देशांपेक्षा अधिक आहे. कर आकारणी जाचक असू नये, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते. मात्र, वस्तू व सेवाकरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले असून, व्यापारी वर्गात अस्वस्थता आहे. या करामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बुधवारी केली.

नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर १५ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील, महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी सर्वच क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. स्मारकांमध्ये बाबासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पडले पाहिजे. भारताच्या आर्थिक जडणघडणीत एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेबांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी एक दालन उभे करण्याची सूचना पवार यांनी पालिकेला केली. पवार यांनी या वेळी स्मारकाच्या वास्तुकलेचेही कौतुक केले.

बाबासाहेबांनी देशाला मोठे स्वप्न पाहायला शिकवले. नवी मुंबई महापालिकेच्या या भव्य स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार जागविण्याचे काम व्हावे, असे रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे म्हणाले. या स्मारकामुळे नवी मुंबईची एक नवी प्रतिमा जगभरात निर्माण होईल, असा विश्वास महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केला. वाचनालय, अभ्यासिका, प्रार्थनास्थळ, पोडियम गार्डन, वस्तुसंग्रहालय अशा बाबींनी हे स्मारक परिपूर्ण होणार आहे, असे पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. सांगितले.