‘पनवेलस्वारी’साठी जात संघटनांची मोट

शिवसेनेसह राष्ट्रवादी, शेकापचे मेळावे

राष्ट्रवादी-शिवसेना

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी, शेकापचे मेळावे

पनवेल महानगपालिकेचा कारभार ऑक्टोबर महिन्यात प्रशासनाच्या हाती जाईल. त्यामुळे महापालिकेवर राजकीय पक्षाचा झेंडा फडकावा, ही मनोमन इच्छा बाळगणाऱ्या पनवेलमधील मुख्य राजकीय पक्षांच्या नेतृत्वाने स्वपक्षाची चांगली बाजू पटवून देण्यासाठी राजकीय गणित आखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या राजकीय पक्षांच्या गणितांमध्ये संबंधित जातींच्या संघटनेचे नेतृत्व करणाऱ्यांचे चांगभले होत असले तरी यामुळे पुन्हा एकदा पनवेलमधील राजकीय गणितांना वेग आल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींमध्ये कालपरवापर्यंत अडगळीत पडलेल्या जात संघटनांना अधिकच महत्त्व प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावून राजकीय बेरजेची गणिते आखली जात आहे. यात सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख आघाडीवर आहेत. गेल्या आठवडय़ात कळंबोली येथील माळी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या राजेंद्र बनकर यांना भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पक्षाच्या वाहतूक सेलचे तालुकाध्यक्षपद देऊन त्यांना फलकांवर झळकवले. कळंबोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असलेले बनकर हे अनेक वर्षे माळी समाजाचे काम करत होते. खारघरमध्येही भाजपने ब्रिजेश पटेल यांना शहराध्यक्षपद देऊन तेथील गुजराती आणि मारवाडी समाजाकडे नेतृत्वाची धुरा दिल्याचे तेथील कार्यकर्ते प्रचार करतात.

शिवसेनेनेही पनवेलमध्ये प्रथमेश सोमण हा चेहरा नेतृत्वासाठी देऊन ब्राह्मण ते सीकेपी या समाज पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशवासीयांची मते आर्कषित करण्यासाठी अनेक वर्षांपासून डी. एन. मिश्रा यांनाही पदाधिकारी बनवून नेतृत्वाची संधी दिली आहे. शेकापने सोमवारी काळण समाज सभागृहात तालुका झोपडपट्टी वसाहत सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामदास धोत्रे यांचा पालिकेतील विरोधी पक्षनेते, शिवसेना नेते, वडार महाराष्ट्र संघाचे संस्थापक विजय चौगुले   यांच्याहस्ते सत्कार केला. या वेळी चौगुले यांनी वडार समाजाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. आमदार विवेक पाटील यांनी या सोहळ्यातून वडार समाजासोबत शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तालुक्यात मराठा व ओबीसी समाजाकडे नेतृत्व देऊन या दोनही समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कळंबोलीत मयूर मोरे यांसारख्या नवीन तरुणांना युवा उपाध्यक्षाची संधी देऊन पश्चिम महाराष्ट्रातील मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हा पक्ष उतावळा आहे. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक यांनी तालुक्यात हळुवार का होईना आपली ताकद वाढविण्याची केलेल्या सुरुवातीमुळे नुकत्याच झालेल्या आमदार अबु आझमी यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये उत्तर प्रदेश व बिहारमधील पनवेलमध्ये राहणाऱ्यांची आझमी भेटीदरम्यानची आकडेवारी वाढत आहे.

मतदाराचा भाव वधारला..

पनवेल शहर महापालिकेच्या घोषणेमुळे तालुक्यात निवडणुकांचे वातावरण असल्यासारखे चित्र आहे. विविध राजकीय पक्षांनी अजेंडय़ावर कार्यक्रम, बैठका व सोहळ्यांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांमध्ये समाजातील प्रत्येक घटकाचे सत्कार करण्याचा सपाटा सुरू आहे. राजकीय पक्षातील पक्षांतरेही वाढली असून पोलीस ठाण्यात व वैद्यकीय सेवेदरम्यान लागणारी मदत हे राजकीय पक्षांतील कार्यकर्ते सामान्यांना देण्यास तत्पर झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena and bjp preparation for municipal elections