नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून ऐरोली येथील नागरिकांसाठी तीन रिंगरूट बससेवेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. मात्र ही सेवा सुरू होत असताना शिवसेनेने पाठपुरावा केल्याने ही सेवा सुरू झाल्याचे जाहीर केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांच्या प्रयत्नाने ही बस सेवा सुरू झाल्याचा दावा करण्यात आल्याने उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनीही या सेवेच्या उद्घाटनांचे फलक ऐरोली बस आगारात लावले होते.
नवी मुंबई परिवहन सेवेच्या माध्यामातून बस क्रमांक ८२, ८३ आणि ८४ अशी ऐरोली-पटनी मुकंद आयर्न मार्गे पुन्हा ऐरोली बस आगार अशी रिंगरूट सेवा सुरू करण्यात आली. शिवसेनेचे नगरसेवक मनोज हळदणकर यांनी पाठपुरावा केल्याचे सांगत विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांच्या उपस्थितीत उद्घाटन स्थळी दाखल झाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याने ही बससेवा सुरू होत असल्यचे सांगत आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटनांचा घाट घातला.
उद्घाटनप्रंसगी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बसचा ताबा घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकर्ते यांनी दुसऱ्या बस मध्ये शिरून उद्घाटन केल्याचे जाहीर केले. तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐरोलीचा फेरफटका मारून ही सेवा आपल्या प्रयत्नाने सुरू झाल्याचा दावा केला. एकीकडे परिवहन सभापती साबु डॅनियल या ठिकाणी असताना परिवहनचे आधिकारी शिवसेनेच्या नेत्यांना घेऊन बस फेरीसाठी निघाल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले.