नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठा, अतिक्रमण आणि अवैध व्यवसायांच्या मुद्द्यांवरून शिवसेना (ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले. नागरिकांच्या मागण्या घेऊन ठाकरेसेनेतर्फे गुरुवारी एमआयडीसीच्या महापे कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
नागरिकांच्या प्रलंबित मूलभूत समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि महिला जिल्हा संघटिका रंजना शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने उपअभियंता आनंद गोगटे यांची भेट घेतली. मागील दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयांवर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपजिल्हाप्रमुख तथा ऐरोली विधानसभा शहरप्रमुख महेश कोटीवाले आणि उपशहरप्रमुख सिद्धराम शिलवंत यांनी दालनातच जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलनकर्त्यांनी तुर्भे झोपडपट्टी परिसरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली. तसेच तुर्भे एमआयडीसीतील बंद कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू, गांजा व भंगार व्यवसायांवर कारवाई करून संबंधित जागा एमआयडीसीने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. भूखंड क्रमांक C-3B वरील अतिक्रमण हटवून पदम इन्वेस्टमेंटच्या अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करावी आणि भूखंड क्रमांक C-440 वरील बेकायदेशीर भंगार व्यवसाय व स्फोटक साठ्यावर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
आक्रमक भूमिकेनंतर उपअभियंता आनंद गोगटे यांनी लेखी आश्वासन देत संबंधितांना नोटीस बजावल्याचे आणि मुदतीत कारवाई करण्याचे सांगितले. तसेच पाणीपुरवठा १५ दिवसांत सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

