शिवशक्ती को-आपरेटिव्ह सोसायटी, वाशी सेक्टर-१७

बँक म्हटलं की हिशेब ओघाने आलाच. वाशी सेक्टर-१७ येथील शिवशक्ती को-आपरेटिव्ह सोसायटी ही मुंबई जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे. सर्वच बँक कर्मचारी असल्यामुळे आर्थिक व्यवहारांपासून वीज-पाणी वापरापर्यंत सर्वच गोष्टींचे हिशेब चोख ठेवले जातात.

मुंबई जिल्हा बँकेने खरेदी केलेल्या भूखंडावर १९८२ साली सिडकोकडे सोसायटीची नोंद झाली. जून १९८५मध्ये सोसायटीच्या सभासदांना घरांचा ताबा देण्यात आला. एकूण चार विंग्ज असलेल्या या सोसायटीमध्ये ८७ कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदतात. कर्मचारी, शिपाई, कार्यकारी संचालक असे बँकेच्या सर्व स्तरांवरील अधिकारी आणि कर्मचारी येथे राहतात. सोसायटीत २६० चौरस फुटांपासुन ते १,२६० चौ फुटांपर्यंत विविध आकारांची घरे आहेत.

मुंबई जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष गुलाबराव शेळके यांच्या पुढाकाराने हे टोलेजंग संकुल उभारण्यात आले. नक्षीदार हिरवळ आणि शोभिवंत झाडांच्या दिखावटीपासून दूर राहत सोसायटीच्या चौफेर कुंपणालगत आतील बाजूला विविध उपयुक्त झाडांची रोपटी लावण्यात आली. आज त्या रोपांचे डेरेदार वृक्षांत रूपांतर झाले आहे. त्यामुळे सोसायटीत नेहमीच गारवा असतो. नामांकित वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली ही सोसायटी उभारण्यात आली. त्या काळात सिमेंटचा तुटवडा होता. त्यामुळे कोरियावरून एक जहाज बुक करून सिमेंट आणण्यात आले. ३२ वर्षांनंतरही ही इमारत भक्कम आहे.

सेक्टर-१७ येथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यापासून त्या गणेशोत्सवातच येथील रहिवासी सहभामगी होतात. ज्येष्ठांनी पाडलेला हा पायंडा तरुण पिढीने पुढे नेला आहे. गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सर्वजण उत्साहाने काम करतात.

इमारतींच्या मधल्या मोकळ्या आवारात वाहने पार्क केली जातात. सोसायटीच्या कार्यालयात घरांच्या आणि वाहनांच्या किल्ल्या ठेवण्यासाठी सोय आहे. त्यांचा गैरवापर झाल्याची एकही तक्रार अद्यप आल्याची नसल्याचे रहिवासी सांगतात. सोसायटीत अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आहे. पाण्याची टाकी भरून वाहू नये आणि पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी ऑटोमॅटिक कट ऑफ मीटर लावण्यात आले आहे. सोसायटीच्या आवारात एलईडी बल्ब बसवून वीज बचत करण्यात येते. अशा प्रकारे काहीही वाया जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

या सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. यातील अनेक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठांच्या समस्यांचा सरकारदरबारी पाठपुरावा करतात. त्यात रेल्वे, निवृत्तीवेतन अशा समस्यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने नेचर ट्रेकिंग क्लब स्थापना करण्यात आला आहे. या क्लबमधील ज्येष्ठ सभासद जंगलांत आणि गडकिल्ल्यांवर जून आणि ऑगस्टमध्ये भटकंती करतात. ही मंडळी नेपाळ, हिमाचल प्रदेश, कर्नाटकचीही सहल करून आले आहेत. या सोसायटीतील काही मंडळी सोसायटी सोडून अन्यत्र स्थायिक झाली असली तरी विवाह सोहळे व अन्य सुख-दुखांच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित असतात.

ओला व सुका कचरा वैयक्तिक पातळीवर वेगळा करण्यासाठी प्रत्येक घरात वेगळे दोन डबे देण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. याशिवाय सौरऊर्जेचा वापर करण्यासाठीही निधीची जमवाजमव सुरू आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष बापुसाहेब देशमुख यांनी सांगितले.

नियमांनुसार कारभार

महाराष्ट्र सहकारी कायदा १९६०, नियम ६१ अंतर्गत संस्थेच्या पोटनियमांनुसार सोसायटीचा कारभार चालतो. सोसयटीचे सगळे सभासद बँकेचे कर्मचारी असल्याने त्यांनी कोणताही अकाउंटंट आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी ठेवला नाही. सोसायटीचे धोरणात्मक निर्णय, करांबाबतचे नियम यांचे नियोजन व व्यवस्थापन सभासदच करतात. सोसायटीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यात येते. वार्षिक सभेत हे अंदाजपत्रक ठेवण्यात येते. या जमाखर्चाच्या अंदाजपत्रकानुसार हिशोबाचा ताळमेळ बसविण्यात येतो. सोसायटीचे सर्व आर्थिक व्यवहार धनादेशाने होतात. याशिवाय चार सुरक्षारक्षक दिवस-रात्र अशा दोन पाळ्यांत काम करतात.