५२० जागांसाठी आतापर्यंत केवळ ५० जणांचे अर्ज

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात करोना रुग्ण वाढत असून ६ हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन बंद केलेली आरोग्य व्यवस्था खुली करीत आहे. मात्र मनुष्यबळ ही मोठी समस्या आहे. यासाठी ५२० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र तिला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत केवळ ५० जणांनी अर्ज केले आहेत.

२४ मार्चपासून तातडीने सेक्टर २२ तुर्भे येथील राधास्वामी सत्संग आश्रमामधील ४११ क्षमतेचे करोना समर्पित आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याप्रमाणेच सेक्टर १९ तुर्भेमध्ये निर्यात भवन येथील ५१७  खाटांच्या क्षमतेचे आरोग्य केंद्रही कार्यान्वित करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी प्राणवायू खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नसणाऱ्या अथवा सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांसाठी करोना काळजी केंदे्र पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहेत. यात रहेजा गृहसंकुलात १ हजार तर इंडियाबुल येथे २ हजार खाटांचे काळजी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मात्र यासाठी आवश्यक मनुष्यबळ महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. गेल्या वर्षीही तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ भरती करण्यात आली होती. मात्र करोनाची परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आल्याने त्यांना कमी करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा मोठी करोना रुग्णवाढ होत असल्याने ५२० इतके मनुष्यबळ भरती करण्यात येणार आहे. आरोग्य विभागांतर्गत प्रतिमाह ठोक मानधनावर कंत्राटी (करार) पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत फक्त ५० जणांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे मनुष्यबळाचा मोठा पेच निर्माण होणार आहे.

कोणती पदे भरणार

यामध्ये वैद्यकशास्त्रतज्ज्ञ १५, मायक्रोबायोलॉजिस्ट ५, एम.बी.बी.एस. ५०, इंटेन्सिव्हिस्ट १०, बी.ए.एम. एस. ७५, बी.एच.एम.एस. ४०, बी.यू.एम.एस. १०, स्टाफ परिचारिका २००, प्रयोगशाळा तंत्रज्ञ २०, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ १५, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ४०, बेडसाईड साहाय्यक ४० पदे भरती करण्यात येणार आहेत.

नवीन पदभरतीमध्ये कमी प्रतिसाद मिळत आहे. इतर जिल्ह्यांतही मनुष्यबळाची गरज आहे. त्या जिल्ह्यांतील उमेदवार स्थानिक ठिकाणी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता एका संस्थेची नियुक्ती करून ही पदे भरली जाणार आहेत. – अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका