महिलेला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी फरार असलेला भाजपा कार्यकर्ता श्रीकांत त्यागीला उत्तर प्रदेशातील मेरठमधून नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत तीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समाजमाध्यमांवर स्वत:ला भाजपा किसान मोर्च्याचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असल्याचे सांगणाऱ्या त्यागीने एका महिलेशी गैरवर्तन केले होते. या घटनेचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.  

फरार झाल्यापासून पत्नी आणि वकिलाच्या संपर्कात असलेला त्यागी मेरठमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी रात्री त्यागी सहारनपूरमध्ये होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी मेरठमध्ये पोहोचताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. जवळच्या काही नातेवाईकांच्या भेटीनंतर त्यागी बुधवारी न्यायालयापुढे आत्मसमर्पण करणार होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर चालवला बुलडोझर, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

नोएडाच्या ‘ग्रँड ओमाक्सी’ सोसायटीमधील त्यागीच्या घराबाहेरचे अनधिकृत बांधकाम सोमवारी प्रशासनाकडून पाडण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी सहाच्या सुमारास त्यागीच्या पत्नीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यापूर्वी शुक्रवारीही त्याच्या पत्नीची तब्बल २४ तास चौकशी करण्यात आली होती. त्यागीच्या काही नातेवाईकांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ‘ग्रँड ओमाक्सी’ सोसायटीमध्ये प्रवेश करुन त्यागीने शिवीगाळ केलेल्या महिलेविषयी विचारणा करणाऱ्या सहा जणांनाही पोलिसांनी अटक केली होती.

विश्लेषण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाला लक्ष केंद्रीत करण्यासाठी सांगितलेले पसमंदा मुस्लिम कोण आहेत?

महिलेशी भांडणानंतर तिला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी कलम ३५४ अन्वये त्यागीविरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून फरार असलेल्या त्यागीचा पोलीस शोध घेत होते.