नवी मुंबई : शहरात विद्युत वाहनांसाठी चार्जिग केंद्रांसाठी नवी मुंबई महापालिकेने २० जागांची निवड केली असून याचे पॉवरग्रिड या कंपनीला देण्यात आले आहे. या कामाचा आढावा पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला असून या केंद्रांची कामे एक एक अशी न करता एकाच वेळी करा असे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर वाहनचालकांना ही सुविधा उपलब्ध करून द्या असेही त्यांनी या वेळी सांगितले.या केंद्रांसाठी नवी मुंबई महापालिकेने २० जागा निश्चित केल्या असून त्यापैकी त्वरित कामे सुरू करण्यात येऊ शकतील अशा १८ जागांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या १८ जागांची महानगरपालिका अभियंता आणि पॉवरग्रिडचे प्रतिनिधी यांनी पुढील दोन दिवसांत संयुक्त पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. पाहणीनंतर केंद्रांसाठी स्थळांची प्राधान्यक्रम यादी तयार करीत त्यानुसार समांतर कामे सुरू करावीत असे या वेळी त्यांनी सूचित केले. कंपनीने काम सुरू करण्यापूर्वी केंद्रांसाठीच्या संबंधित प्रत्येक बाबीची स्थळनिहाय कालमर्यादा निश्चित करावी व तेथील केंद्रांसाठी आवश्यक उपकरणे व साहित्य यांची उपलब्धता करून घ्यावी. स्थापत्य कामे, विद्युत उपकरणे याची टप्पेनिहाय आखणी करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
कॅफेटेरियाची सुविधा
वाहन चार्जिगसाठी प्रत्येक केंद्रावर स्लो व अतिजलद सुविधा असणार आहे. या दोन्हींसाठी वाहन चार्जिगसाठी लागणारा वेळ लक्षात घेत त्या वाहनचालकांच्या विरंगुळय़ासाठी उत्तम दर्जाच्या कॅफेटेरियाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, प्रसाधनगृह व इतर सुविधांसह तेथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे असे स्पष्ट निर्देश महापालकिा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.