पनवेल : पनवेल पालिकेने पहिल्या करोना प्रतिबंधक लसमात्रेचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठले असले तरी अद्याप पनवेल पालिका क्षेत्रात करोना संसर्गाचे संकट कायम आहे. पालिका क्षेत्रात गेल्या १० दिवसांत करोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला असून ३८५ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याचदरम्यान करोनातून बरे झालेल्यांची संख्या ५०४ एवढी आहे.

करोना संसर्गाप्रमाणे कळंबोली येथे राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाचा डेंग्यूने उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने अजूनही आरोग्याचा प्रश्न पनवेलमध्ये कायम असल्याचे चित्र आहे. पनवेल पालिका क्षेत्रात आतापर्यंत ६७,६२१ करोना रुग्ण आढळले असून मृतांची संख्या १३४८ वर पोहचली आहे. आजही पनवेल पालिका परिसरात ३३८ रुग्ण करोना संसर्गावर उपचार घेत आहेत. पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने ३० विविध केंद्रांत लसीकरण मोहीम सुरू केली असून पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट साध्य केल्याचा दावा पालिकेचे वैद्यकीय आरोग्य विभागाने केला आहे. अजूनही दुसऱ्या लसमात्रेचे ४७ टक्के लसीकरण झाले असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता पालिकेला आहे.

गेल्या १० दिवसांत उपचारांदरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जणांचा मृत्यू पनवेलमध्येच झाला आहे. इतर रुग्ण मागील महिन्यात  पालिका क्षेत्राबाहेर उपचारांसाठी गेले होते.

डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पनवेल पालिका

दहा दिवसांतील करोना स्थिती

तारीख        बाधित बरे रुग्ण मृत्यू

२० ऑक्टोबर    ३४    २६     ०

१९ ऑक्टोबर    २९     ४५     २

१८ ऑक्टोबर    ४०     ५६     २

१७ ऑक्टोबर    ४२     ४६     ०

१६ ऑक्टोबर    ३६     ७१    ०

१५ ऑक्टोबर    ४१     ५३     ०

१४ ऑक्टोबर    ३८      ५९    ०

१३ ऑक्टोबर    ३३     ७२    १

१२ ऑक्टोबर    ५१     ४०     ०

११ ऑक्टोबर    ४१     ३६     १

 एकूण       ३८५    ५०४    ६