नवी मुंबई : शहरातील विविध भागांतून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांची मालिकाच सुरू झाली आहे. रबाळे, एपीएमसी आणि कोपरखैरणे ठाण्यांच्या हद्दीतून चार मुली गायब झाल्याच्या ताज्या प्रकरणांनंतर, तुर्भे आणि एनआरआय सागरी पोलीस ठाण्यांतून आणखी दोन मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत नोंदविलेल्या या तक्रारींमुळे नवी मुंबईतील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर परत न आल्याची तक्रार कुटुंबीयांनी नोंदवली आहे. परिसरातील सीसीटीव्ही, मार्गावरील हालचाली आणि मोबाईल लोकेशन्स यांचा तपास सुरू असून, एखाद्याने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या गायब झाली आहे. ती घरात एकटी असताना अचानक दिसेनाशी झाली असून तिचा मोबाईल बंद असल्याने शोधमोहीम अधिक आव्हानात्मक झाली आहे. या मुलीचे नाव यापूर्वी काही प्रकरणांत नमूद असल्याची नोंद पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तपासाची दिशा अधिक व्यापक ठेवून पोलिसांनी छाननी सुरू केली आहे.

रबाळे, एपीएमसी आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्यांतही अशाच प्रकारे चार मुली घरा बाहेर पडल्यावर परत न आल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. बेपत्ता होण्याची कारणे अद्याप स्पष्ट नसून, अनेक प्रकरणांत कुटुंबीयांना कोणताही पुरावा किंवा हालचाल दिसून आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अल्पवयीन मुलगी हरवल्यास तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदविणे बंधनकारक असल्याने सर्व प्रकरणांत भा.द.वि. ३६३ च्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नवी मुंबई पोलिसांनी या सर्व प्रकरणांचा एकत्रित आढावा घेत संयुक्त तपास सुरू केला आहे. विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी, तपास पथके आणि तांत्रिक पथके सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन्स, मित्रपरिवाराशी चौकशी तसेच पूर्वीच्या नोंदींचा सखोल अभ्यास करून तपास पुढे नेत आहेत. मात्र अद्याप कोणत्याही मुलीचा ठोस मागमूस मिळालेला नाही.

या घटनांनी शहरातील पालकांची चिंता वाढवली असून, शाळा-कॉलेज परिसरापासून वसाहती आणि सार्वजनिक जागांत मुलांच्या सुरक्षेबाबत चर्चा पुन्हा वाढू लागली आहे. वाढत्या बेपत्ता मुलींच्या प्रकरणांमुळे नागरिकांच्या मनात शहरातील सुरक्षा यंत्रणांबाबत शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.

दरम्यान, शहरातील नागरिकांनी सतर्क राहून याबाबत कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्यांत देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच आपल्या अल्पवयीन मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि सुरक्षिततेबाबत त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

शहरातील वाढत्या बेपत्ता मुलींच्या तक्रारींनी नवी मुंबईत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, या सर्व मुलींचा तातडीने शोध लागावा, ही अपेक्षा पालक आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.