नवी मुंबई : शहरी भागात वाचन संस्कृती वाढावी यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या नवी मुंबई पालिकेने आता झोपडपट्टीतील विद्यार्थी व वाचनाची आवड असलेल्या नागरिकांसाठी झोपडपट्टी तेथे शाळा आणि शाळा तेथे वाचनालय अशी एक संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  पुस्तके ही केवळ शहरवासीयांची मक्तेदारी न राहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने ती बहुजन समाजातील सर्वाचीच आवड व्हावी यासाठी पालिकेने विशेष वाचनालय आराखडा तयार केला आहे.

नवी मुंबई पालिकेने यंदा वाचन संस्कृती जतनासाठी विशेष उपाययोजना केलेल्या आहेत. या सर्व सुधारणा या केवळ शहरी भागात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेचा ग्रामीण व झोपडपट्टी भाग यापासून दुर्लक्षित असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. नवी मुंबईत ४१ झोपडपट्टी वसाहती आहेत. अलीकडच्या काळात यात भर पडली आहे. शहराच्या एकूण पंधरा लाख लोकसंख्येची २५ टक्के लोकसंख्या ही एमआयडीसी भागात गेली अनेक वर्षे वसलेल्या झोपडपट्टी क्षेत्रात असून २२ नगरसेवक या क्षेत्रातून निवडून येत आहेत. नवी मुंबई पालिकेने मागील तीस वर्षांत या झोपडपट्टी भागाचा पायाभूत सुविधांच्या दृष्टीने चांगला विकास केला आहे. त्यामुळे शहरी भागातील पायाभूत सुविधांची तुलना करता येईल अशा सुविधा झोपडट्टीत आहेत. यात वाचनालयांची मात्र कमी आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील मुलांनाही वाचनाचा हक्क आहे. त्यांना वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते वाचू शकणार आहेत. त्यांच्या वाचनाची आवड निर्माण करता यावी यासाठी झोपडपट्टी भागात असलेली समाज मंदिरे, शाळा या ठिकाणी वाचनालये सुरू करण्याचा पालिका प्रस्ताव तयार करीत आहेत.