कंपनीवर गुन्हे दाखल करा ; खारफुटी तोडप्रकरणी तहसील कार्यालयासमोर उपोषण

या वेळी त्यांनी खारफुटीची झुडपे समुद्रात फेकल्याने मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान झाले आहे.

उरण : करंजा टर्मिनल या खासगी बंदराकरिता किनाऱ्यावरील खारफुटीची तोड करीत ती समुद्रात फेकण्यात आली. या प्रकरणी तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याने आता येथील सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा या प्रमुख मागणीसाठी बुधवारी उरण सामाजिक संस्थेने उरण तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला उरण तालुक्यातील विविध सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांनीही जाहीर पाठिंबा दिला.

उरण समुद्र किनाऱ्यावर करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीमार्फत एक खासगी बंदर विकसित करण्यात येत आहे. यासाठी खारफुटींची मोठय़ा प्रमाणात तोड केली. याचा सुगावा लागू नये म्हणून ही तोडलेली खारफुटी बोटीच्या माध्यमातून भर समुद्रात फेकून देण्यात आली होती. याबाबत पुराव्यांसह रायगड जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस तसेच वन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र अद्याप कंपनीविरोधात कारवाई झाली नाही. त्यामुळे येथील समाजिक संस्था आता आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी बुधवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी उरण तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

या वेळी त्यांनी खारफुटीची झुडपे समुद्रात फेकल्याने मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, त्याचप्रमाणे तोडलेली खारफुटी वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेले जहाज जप्त करावे या मागण्याही केल्या.

उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी या वेळी प्रशासन अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर ढिम्म आहेत. त्यांचा या कृतींना पाठिंबा आहे का असा सवाल करीत न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.  या वेळी संस्थेचे सचिव संतोष पवार, सीमा घरत, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, काँग्रेसच्या मच्छीमार विभागाचे कोकण अध्यक्ष मरतड नाखवा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांनीही पाठिंबा देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

फलकावर परवानगीचा

क्रमांकच नसेल तर पालिका तात्काळ का कारवाई करत नाही? मुळात हे फलक गरज सरल्यानंतर उतरवून काय उपयोग? याला प्रशासनच जबाबदार आहे.

संदीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Social activists protest for action against the cutting of mangrove tree zws