समुद्रातील हालचालींवर पोलिसांची करडी नजर
समुद्राच्या मार्गाने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना अटकाव करण्यासाठी राज्यातील सागरी किनाऱ्यावर अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे पोलिसांचे टेहळणी मनोरे उभारण्यात येणार असून उरणच्या मोरा सागरी किनाऱ्यावर मोरा बंदराशेजारी टेहळणी मनोरा उभारण्यात येणार आहे. मेरिटाइम बोर्डाच्या मोरा मच्छीमार सोसायटी कार्यालयासमोर हा टॉवर उभारला जाणार आहे. या मनोऱ्यावरून मुंबई ते मोरादरम्यानच्या समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. २६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर सागरी किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांचा हा भाग असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले.
उरण तालुक्यातील सागरी किनारा हा सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. याच किनाऱ्यावरून १९९३ च्या स्फोटाच्या वेळीही चौकशी झालेली होती. त्यामुळे मुंबईलगत असलेल्या या सागरी किनाऱ्यावर सुरक्षा ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या देखरेखीखाली मोरा सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.
उरण तालुक्यात ओएनजीसी, जेएनपीटी बंदर त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणात ज्वलनशील पदार्थाचे साठे आहेत. त्यामुळे येथील सागरी किनारेही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे.
सागरी किनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सागरी पोलिसांकडून स्थानिक नागरिक, मच्छीमार यांचीही मदत घेतली जाते. त्यासाठी सागरी सुरक्षा दल, पोलीसमित्र आदींची सुरुवात करून तरुणांना सामावून घेण्यात आल्याची माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस.पठाण यांनी दिली.
मोरा सागरी पोलीस ठाण्याकडून उरणच्या किनाऱ्यावर चार ठिकाणी टेहळणी मनोरा उभारण्यात येणार आहेत. याची सुरुवात मोरा जेट्टीजवळील मेरिटाइम बोर्डाच्या जागेपासून करण्यात आली आहे. ही जागा मेरिटाइम बोर्डाची असून मनोरा बोर्डाकडून बांधून देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे रायगड विभागीय उपअभियंता सुधीर देवरे यांनी दिली.