आजपासून नवी मुंबईत १० महिला विशेष बस

नवी मुंबईतील महिला प्रवाशांना एनएमएमटी प्रशासनाने महिलादिनी एक अनोखी भेट दिली आहे. गर्दीच्या वेळी सुखकर प्रवास करता यावा म्हणून आजपासून १० तेजस्विनी महिला विशेष बस नवी मुंबईत धावणार आहेत. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या बस घेण्यात आल्या असून गेला महिनाभर मुहूर्ताची वाट पाहात त्या डेपोत पडून होत्या.

या बसेसचा शुक्रवारी वाशी डेपो येथे शुभारंभ करण्यात आला. महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, परिवहन सभापती रामचंद्र दळवी, परिवहन सदस्य व मान्यवर उपस्थित होते. महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या या तेजस्विनी बस गर्दीची ठिकाणे असलेल्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. दहाही बस पूर्णत: स्वयंचलित प्रकारातील असल्याने या बसच्या चालक-वाहक महिलाच असणार आहेत, विशेष सुरक्षारक्षकदेखील देण्यात येणार आहेत. या बस घेण्यासाठी राज्य शासनाकडून प्रतिबस २५ लाख याप्रमाणे २.५ कोटी, तर परिवहन उपक्रमाकडून ५ लाख याप्रमाणे ५० लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. प्रत्येक बसमध्ये ३२ सीट आहेत.

यावेळी बेलापूर येथील जुन्या मुख्यालयात निर्माण करण्यात आलेल्या ‘आयआयटीएमएस’ या जीपीएसद्वारे ४५८ बसेस, तसेच ३ आगार व १४ नियंत्रण कक्ष मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडले गेलेल्या प्रणालीचेही उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे मोबाइल ई-तिकीट व स्मार्ट कार्ड सेवेचेही लोकार्पण करण्यात आले.

यावेळी परिवहनचे सभापती रामचंद्र दळवी यांनी या बससेवेमुळे महिलांना प्रवासासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. आगामी काळात एनएमएमटी प्रशासन प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

महिलादिनी महिलांसाठीची महिला विशेष बस मला चालवण्याची संधी मिळाली, याची महिला वाहनचालक म्हणून मला आनंदच आहे. महिलांना सामान्य बसमधून प्रवास करताना अनेक अडचणी येतात. परंतु या विशेष महिला बस असल्याने महिलांना सुखकर प्रवास करता येणार आहे. योगिता माने, वाहनचालक, तेजस्विनी बस

गर्दीच्या वेळी महिला विशेष

या बसेस फक्त महिला प्रवाशांसाठी आरक्षित असणार आहेत. गर्दीच्या वेळेत बसेस चालविण्याच्या वेळा सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ५ ते ९ या दरम्यान किंवा स्थानिक परिस्थिती व आवश्यकतेनुसार चालविण्यात येतील. तसेच इतर वेळी नियमित आसनव्यवस्थेनुसार चालविण्यात येतील.

तेजस्विनी बसेसचे मार्ग

  • बस क्रमांक ९ : वाशी रेल्वे स्थानक ते घणसोली / घरोंदा
  • बस क्रमांक २० : घणसोली / घरोंदा ते नेरुळ से. ४६/४८
  • बस क्रमांक २२ : वाशी सेक्टर ७ ते खारघर / जलवायू
  • बस क्रमांक ८३ : ऐरोली बसस्थानक ते ठाणे मार्गे पटणी
  • बस क्रमांक ५३ : खारघर रेल्वे स्थानक ते खारघर व्हॅली शिल्प सेक्टर ३६
  • बस क्रमांक ५४ : खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा आरएएफ
  • बस क्रमांक ५६ : मानसरोवर रेल्वे स्थानक ते कळंबोली पोलीस मुख्यालय