Special honor to Shubham Vanmali prestigious National Award field of swimming navi Mumbai news ysh 95 | Loksatta

नवी मुंबई: साहसी जलतरण क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल शुभम वनमाळीचा विशेष सन्मान

अर्जुन पुरस्कारासारखा मानाचा समजला जाणारा साहसी खेळामधील ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार नुकताच नेरूळ मधील साहसी जलतरणपटू शुभम धनंजय वनमाळी यांना प्रदान करण्यात आला

नवी मुंबई: साहसी जलतरण क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल शुभम वनमाळीचा विशेष सन्मान
शुभम वनमाळी

नवी मुंबई: अर्जुन पुरस्कारासारखा मानाचा समजला जाणारा साहसी खेळामधील ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार  नुकताच नेरूळ मधील साहसी जलतरणपटू शुभम धनंजय वनमाळी यांना  राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. यामुळे नवी मुंबईचा नावलौकिकात देश पातळीवर क्रीडा क्षेत्रात उंचावलेला आहे.शुभम वनमाळी यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच त्यांस प्राप्त झालेल्या साहसी खेळामधील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या हस्ते, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या  उपस्थितीत  सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट प्रदान करून गौरव करण्यात आला.

सन २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराने शुभम यांचा क्रीडाविषयक कामगिरीचा राज्यस्तरीय गौरव झाला असून ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ प्रदान होत असताना त्यांनी मांडवा जेट्टी ते एलिफंटा हे २१ किमीचे अंतर ५ तास ४ मिनीटे ५ सेकंदात, गेटवे ऑफ इंडिया ते डहाणू बीच हे १४७ किमीचे अंतर २८ तास ४० मिनीटात, राजभवन भवन ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किमी चे अंतर ३ तास १२ मिनीटे १० सेकंदात पार केल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.

हेही वाचा >>> नवी मुंबई महापालिका इतिहासात प्रथमच होणाऱ्या लिडार सर्वेक्षणाला मुदतवाढ

आंतराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू ही ओळख असणाऱ्या शुभम वनमाळी यांनी यापूर्वी जगातील सुप्रसिध्द इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, कॅटनीला खाडी, मॅनहटन मॅरेथॉन स्वीम, राऊंड ट्रिर अन्जल आयलँड स्वीम, परहेन्शियन आयलँड मॅरेथॉन स्वीम अशा विविध राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय खाड्या विक्रमी वेळेत पोहून अनेक जागतिक विक्रम केलेले आहेत. त्यांच्या या यशाचे कौतुक विविध स्तरांतून झालेले असून त्यांच्या विक्रमांमुळे नवी मुंबईच्या क्रीडा विश्वाची शान वाढलेली आहे. त्यांचे मला लाट व्हायचंय हे आत्मचरित्रदेखील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. अनेक विक्रमांनी, पुरस्कारांनी सन्मानीत शुभम वनमाळी यांचा राष्ट्रीय स्तरावरील साहसी खेळातील सर्वोच्च मानाचा ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने  विशेष सत्कार करण्यात आला.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 20:45 IST
Next Story
नवी मुंबई महापालिका इतिहासात प्रथमच होणाऱ्या लिडार सर्वेक्षणाला मुदतवाढ