कोपरखरणेमधील राफा नाईक हायस्कूल बस थांब्याजवळ वाहनांची वर्दळ असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागत होते, म्हणून या ठिकाणी मंगळवारी दुपारी गतिरोधक टाकण्यात आला. मात्र सकाळी अचानक हा गतिरोधक गायब झाल्याचे निदर्शनास आले. हा गतिरोधक चोरीला गेल्याची तक्रार घेऊन स्थानिक नगरसेवक थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी मात्र तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनीदेखील मागणीनंतर हा गतिरोधक आवश्यक असल्याचा अहवाल दिला असताना गतिरोधक गायब झाला कुठे, हीच चर्चा कोपरखरण्यात रंगली होती.
कोपरखरणे येथील राफा नाईक हायस्कूल बस थांब्याजवळ गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिक वारंवार करीत होते. याचा पाठपुरावा स्थानिक नगरसेवक रामदास पवळे यांनीदेखील करून वाहतूक शाखेच्या पोलिसांना या गतिरोधकाचे महत्त्व पटवून दिले होते. अखेर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी महापालिका शहर अभियंता मोहन डगावकर यांना पत्रव्यवहार करून हा गतिरोधक बसविण्यासाठी सूचना केली होती. अखेर पालिका प्रशासनाने मंगळवारी दुपारी हा गतिरोधक बसविण्याचे काम केले. मात्र बुधवारी सकाळी अचानक हा गतिरोधक गायब झाल्याची घटनी घडली.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक रामदास पवळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यास असमर्थता व्यक्त केल्याने त्यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला. या संदर्भात पालिका अभियंत्यांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने तात्पुरता हा गतिरोधक काढण्यात आला असून येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा नव्याने गतिरोध टाकण्यात येईल, अशी सारवासारव केली आहे. यादरम्यान कंत्राटदार वापरत असलेल्या साहित्यांचा दर्जाचा प्रश्न आणि पालिकेच्या कामकाजाचा ढिसाळ नमुनाच समोर आला आहे.