उरण : डिनोटीफाईड नवी मुंबई सेझने उरण येथील पागोटेमध्ये पाच हजारांहून अधिक खारफुटींची कत्तल केली. त्यावर उच्च न्यायालय-नियुक्त समितीने सागरी वनस्पतींचे संवर्धन करण्याचे निर्देश देऊनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, निसर्गाने स्वत:च्या बळावर उभारी घेतल्याने आता पुन्हा हिरवाई फुलणार असल्याचा आनंद पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला.
साधारण ३० महिन्यांपूर्वी ओसाड वाटेल या अवस्थेत असलेल्या पागोटे क्षेत्रात सागरी हिरवळ फुलू लागल्याने आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याचे नाटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले. ते श्री एकवीरा आई प्रतिष्ठानच्या नंदकुमार पवार यांच्यासोबत उरण कांदळवन क्षेत्र बचावाची मोहीम राबवत आहेत.
पायाभूत विकास प्रकल्पांच्या नावाखाली उरणमधील कांदळवने आणि पाणथळींचा विनाश सुरू असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. उरण, खारघर, उलवे आणि नवी मुंबईतील काही ठिकाणी असलेली कांदळवने ही संवर्धनासाठी वन विभागाकडे सुपूर्द करावी असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८ दरम्यान दिला होता. मात्र तसे न झाल्याने या हरित पट्टय़ाचा बेसुमार विनाश झाल्याची माहिती श्री एकवीरा आई प्रतिष्ठानच्या नंदकुमार पवार यांनी दिली. आजही हजारो कांदळवने नवी मुंबई सेझकडेच असल्याने भविष्यात मोठय़ा प्रमाणावर विनाश उद्भवू शकतो या मुद्दय़ाकडे कुमार यांनी लक्ष वेधले.
वास्तविक खारफुटींची कत्तल झाल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. तसेच नवी मुंबई सेझने पाच हजारहून अधिक खारफुटी रुजवण्याविषयी उरण तहसीलदारांना पत्राद्वारे सूचित करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले.
द्रोणागिरी सागरी मार्गावर असलेल्या पागोटेच्या दोन्ही बाजूला कांदळवनांचा ऱ्हास झाला आहे. एकीकडे सुमारे १० हेक्टरहून अधिक क्षेत्रात असलेल्या कांदळवनांची कत्तल करण्यात आली, तर दुसरीकडे ट्रकभर राडारोडा आणून पाणथळ बुजविण्याचे प्रकारही झाले. या अर्धमेल्या वनस्पतींनी आता पुन्हा उभारी घेतली असून त्याचे श्रेय भरतीच्या पाण्याला जाते. तरीही राडारोडय़ाखाली बुजलेल्या खारफुटीच्या प्रवाहाला अटकाव होत असल्याचे पवार यांनी सांगितले.