लस खरेदीचा पालिकेचा निर्णय; आठवडाभरात दहा हजार मात्रा
नवी मुंबई : शासनाकडून लसपुरवठय़ात सातत्य नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. तर पालिकेने काढलेल्या जागतिक निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने आता डॉ. रेड्डीज या लसपुरवठादाराकडून स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात पालिकेला ही लस मिळणार
असून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. काही दिवसांत पालिकेला पहिल्या टप्प्यात दहा हजार स्पुटनिक लस कुप्या मिळणार आहेत.
नवी मुंबईत पालिका प्रशासनाने तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी लसीकरण केंद्रे व मनुष्यबळ तयार ठेवण्यात आले आहे. मात्र शासनाकडून होणारा लसपुरवठा कमी असल्याने अनेक केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. लस उपलब्धतेनुसार काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने लस खरेदी करण्याचा निर्णय घेत जागतिक निविदा काढल्या होत्या. मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हेही नियोजन कोलमडले होते. त्यात शासनाकडून लस मिळत नसल्याने लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप वाढत आहे.
यामुळे पालिका प्रशासनाने आता लस पुरवठादार डॉ. रेड्डीज यांच्याकडून स्पुटनिक ही लस जशी उपलब्ध होईल तशी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची पुरवठादाराबरोबर चर्चा झाली असून आठवडाभरात सुमारे दहा हजार लस कुप्या पालिकेला मिळणार असल्याचे पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले. ही लस प्राधान्याने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना जाणार आहे. स्पुटनिक लशींच्या दोन मात्रेसाठी पालिकेला १८०० ते १९०० रुपये मोजावे लागणार आहेत.
१८०० ते १९००
दोन मात्रेसाठी पालिकेला १८०० ते १९०० रुपये पालिका पुरवठादाराला देणार असून नागरिकांना ती मोफत देण्यात येणार आहे.
१०,०००
आठवडाभरात दहा हजार लस कुप्या मिळणार असून ही लस प्राधान्याने शहरातील ज्येष्ठ नागरीकांना जाणार आहे.
लस तुटवडा कायम
नवी मुंबई महापालिकेला शासनाकडून गेली दोन दिवस लस मिळालेली नाही. सोमवारी ९ हजार लस कुप्या मिळाल्या होत्या. त्यातून बुधवारी जास्तीत जास्त लसीकरण करण्यात आले. गुरुवारीही काही मोजक्याच केंद्रांवर दुसरी मात्रा देण्यात आली. सायंकाळपर्यंत लस न मिळाल्याने शिल्लक लस कुप्यांनुसार शुक्रवारीही पालिकेच्या रुग्णालयातच दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयांत स्पुटनिक लसीकरण
पालिकेने स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शहरातील काही खासगी रुग्णालयांनीही स्पुटनिक लस खरेदी केली असून तिचे लसीकरण सुरू केले आहे. नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी रुग्णालय व रिसर्च सेंटर येथे ७५ नागरिकांना गुरुवारी ही लस देण्यात आली. सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत येथे लसीकरण सुरू राहणार आहे. एका मात्रेसाठी ११४५ रुपये घेतले जात आहेत. नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील विद्यार्थी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही स्पुटनिक लसीकरण करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिकेने डॉ. रेड्डीज या स्पुटनिक लसच्या लसपुरवठादाराकडून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून प्राप्त होणारी लशींबरोबर स्पुटनिक लस खरेदी करून ज्येष्ठ नागरिकांना देण्याचे नियोजन आहे. पुढील काही दिवसांत १० हजार स्पुटनिक लस कुप्या प्राप्त होतील.
-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका
