पनवेल : सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरांत सुशोभीकरणांची कामे सुरू आहेत. या अंतर्गत पनवेल महापालिकेने स्वच्छता कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने टाकाऊ वस्तूंपासून शहरांतील २५ चौकांचे फक्त तीन लाखांत सुशोभीकरण केल्याचा दावा पनवेल महापालिका प्रशासनाने केला आहे.
शेजारील नवी मुंबई महापालिकेत सध्या स्वच्छ भारत अभियानांवर होत असलेल्या कोटय़वधींच्या खर्चाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका प्रशासनाने कमी खर्चात केलेल्या कामाबाबत कौतुक होत आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून या चौकांचे केलेले सुशोभीकरण आकर्षित करीत आहे.
या वर्षी पनवेल महापालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या पाच शहरांमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी पालिका क्षेत्रात बेवारस टकालेल्या टाकाऊ वस्तूंची जुळवाजुळव करीत त्या वस्तूंची कल्पकतेने मांडणी व रंगरंगोटी करीत त्यातून शहरांतील चौक सुशोभीकरण हाती घेतले आहे. स्वच्छता विभागाच्या आरोग्य निरीक्षकापासून ते स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परदमोड करून या वस्तूंना आकार दिला आहे. अद्याप याबाबत कोणतीही देयके कर्मचाऱ्यांनी पालिकेकडे मागितली नाहीत. यासाठी पालिकेचे कर्मचारी दिवस-रात्र जागून काम करीत असल्याने त्यांना हातभार लावण्यासाठी नागरिकही सक्रिय झाले असून एक स्वच्छता चळवळ शहरात रुजत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त सचिन पवार यांनी याबाबत कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यावर हा खर्च कर्मचारी स्वत:च करत असल्याचे समोर आले. सध्या २५ चौकांचे सुशोभीकरण झाले असून त्यासाठी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या लोकवर्गणीचा खर्च अवघा तीन लाख रुपये झाला आहे. यातून खारघरमधील चौकात माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. तर एसटीची जुनी बस रहिवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.
नवी मुंबई महापालिकेत या चौकांच्या सुशोभीकरणसाठी आतापर्यंत ५० कोटींपेक्षा अधिकचा खर्च झाल्याचे पनवेल पालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.