scorecardresearch

विमानतळासाठी स्टेट बँकेची कर्जहमी; १२ हजार ७७० कोटी रुपयांच्या निधी उभारणीचा अदानी समूहाचा मार्ग मोकळा

सोळा हजार कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला वित्त पुरवठा करण्यास अनेक वित्त संस्थांनी नकार दिल्याने जीव्हीके समूहाने नवी मुंबई विमानतळ कंपनीतील ७४ टक्के भागभांडवल अदानी समूहाला विकले.

नवी मुंबई : सोळा हजार कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला वित्त पुरवठा करण्यास अनेक वित्त संस्थांनी नकार दिल्याने जीव्हीके समूहाने नवी मुंबई विमानतळ कंपनीतील ७४ टक्के भागभांडवल अदानी समूहाला विकले. आता अदानी समूहाला स्टेट बँकेने १२ हजार ७७० कोटी रुपयांची कर्जहमी विमानतळ प्रकल्पाला देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे वित्त साहाय्याअभावी गेली काही महिने संथगतीने सुरू असलेले नवी मुंबई विमातनळाचे काम आता अधिक गतीने होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई विमानतळाबाबतचा प्रस्ताव जुलै २००८ मध्ये राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. या प्रकल्पासाठी एकूण २०६८ हेक्टर जमीन लागणार असून प्रत्यक्षात प्रकल्प ११६० हेक्टर जमिनीवर उभा राहणार आहे.
२०१७ मध्ये या प्रकल्पासाठी जागतिक निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. बांधकाम व्यवसायातील पाच बडय़ा कंपन्यांनी यात रस दाखविला होता. जीव्हीके समूहाला हे काम मुंबई विमातनळ नूतनीकरणात घातलेल्या अटीमुळे मिळाले.
फेब्रुवारी २०१८ मध्ये या विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली. सिडकोनेही विमानतळ पूर्व कामावर दोन हजार कोटी रुपये खर्चाची कामे केलेली आहेत. जीव्हीके उद्योग समूहाच्या आर्थिक संकटामुळे या समूहाला विमानतळासाठी लागणारे कर्ज मिळू शकले नाही. याच काळात या समूहाच्या मुंबई कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयचे छापे पडल्यामुळे या समूहाचा पाय अधिक खोलात गेला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाची निविदा मिळूनही हा समूह आर्थिक साहाय्य अभावी धावपट्टी व टर्मिनल्स सारखी कामे करूशकले नाहीत. यामुळे प्रकल्प देखील रखडला आहे.
या समूहाने नंतर नवी मुंबई विमानतळ एअरपोर्ट कंपनीतील ७४ टक्के भाग भांडवल अदाणी उद्योग समूहाला विकले आहेत. त्यामुळे हा विमानतळ जीव्हीके समूहाकडून अदाणी उद्योग समूहाकडे गेला आहे. या समूहाला केंद्र व राज्य सरकारकडून लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या असून प्रकल्पासाठी आवश्यक असलेला वित्त पुरवठा देखील आता ‘स्टेट बँक’ या राष्ट्रीयकृत बँकेने देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती येणार आहे. या आधारे अदानी समूहाला स्टेट बँकेसह अन्य बँकाकडून कर्ज उभे करण्यास मदत होणार आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: State bank loan airport adani group paves rs 12770 crore fund raising amy