पनवेल ः पनवेल महापालिकेने पुन्हा एकदा प्लास्टिक पिशवीविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी केलेल्या कारवाईत पालिकेने ३७ किलोग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त केल्यानंतर व्यापाऱ्यांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारची कारवाई महापालिकेच्या खारघर, कामोठे आणि कळंबोली या तीन विविध प्रभागांमध्ये करण्यात आली. प्रभाग समिती 'अ' खारघर प्रभागामध्ये रेल्वे स्थानक परिसरात पाच किलोग्रॅम प्लास्टिक पिशव्या (सिंगल युझ प्लास्टिक) जप्त करण्यात आल्या. या कारवाईमध्ये ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रभाग समिती ‘ब’ कलंबोली प्रभागामध्ये भाजी व फळ विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून १० किलोग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त करून त्यांच्याकडून ११ हजार रुपये वसूल करण्यात आले. प्रभाग समिती ‘क’मधील कामोठा, खांदेश्वरमध्ये फळ व भाजी विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून २२ किलोग्रॅम वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हेही वाचा - पाणीकपातीबाबत गणेश नाईकांची तीव्र नाराजी, जलसंपन्न नवी मुंबई शहरात पाणीकपात करणे पालिकेला भूषणावह नसल्याचे मत हेही वाचा - नवी मुंबई : फिरस्ती विक्रेत्याप्रमाणे गांजा विकणारे २ अटकेत, तीन फरार ही कारवाई पालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या आदेशानंतर पालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक व स्वच्छता दूत यांच्या पथकाने केली. प्लास्टिक विरोधी कारवाईमध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यावर ५ हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर १० हजार रुपये आणि तिसरा गुन्हा नोंद झाल्यावर २५ हजार रुपये दंडांसह तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूद असल्याची माहिती महापालिकेने दिली.